नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. सहकुटुंब काळूबाई दर्शनासाठी जात होते, त्यावेळी बंद पडलेल्या वाहनाकडे रस्ता पार करून पायी जात असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघाताची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावर सारोळे येथील हॉटेल मल्हार समोर घडली आहे.
उत्तम वामन झेंडे (वय-६०, रा. वडकी नाला, ता. हवेली) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालक मुगुटसाहब अब्दुल कादीर जयलानी सय्यद (वय-२७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत अंकुश राजाराम फाटे (वय ३८, रा. वडकी- तळेवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेंडे कुटुंबिय मांढरदेवी काळूबाई दर्शनाला जाण्यासाठी वाई रस्त्याने दोन वाहनांनी निघाले होते. त्यावेळी सकाळी पुणे-सातारा महामार्गावर सारोळे येथे त्यातील एका वाहनाचा टायर पंक्चर झाला होता. तेव्हा उत्तम झेंडे हे दुसऱ्या वाहनातुन पुढे निघून गेले होते. गाडीचा टायर पंक्चर झाल्याचा फोन येताच ते वाहनासह सारोळा उड्डाणपुलाखालून पुन्हा वळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन थांबले.
दरम्यान, रस्ता ओलांडत पलीकडे असलेल्या वाहनाकडे जात असताना सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकची त्यांना जोराची धडक बसली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर झालेल्या या अपघाताने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस, महामार्ग पोलिस व आर.टी.ओ. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबतचा पुढील तपास पोलिस हवालदार नाना मदने करत आहेत