लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या प्रचारात अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलच्या सर्व उमेदवारांनी गावोगावी जाऊन शेतकरी सभासदांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीदरम्यान मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आमच्या पॅनलला कौल दिला आहे. त्यामुळे या कारखान्यावर आमचेच उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील व निवडणुकीच्या निकालानंतर ते कारखान्याची चिमणी पेटवून शेतकरी सभासदांना न्याय देतील, असा विश्वास पॅनल प्रमुख व कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांनी व्यक्त केला.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील खोकलाई देवी चौकात अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलची प्रचार सांगता सभा गुरुवारी सायंकाळी पार पडली. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी कांचन, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक राजाराम कांचन, सुदर्शन चौधरी, कारखान्याचे माजी संचालक सुरेश घुले, सुभाष काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, महादेव कांचन, राजीव घुले, रोहिदास उंद्रे, राजेंद्र टिळेकर, सुरेश घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती युगंधर काळभोर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मेहुणे उमेश शहा, राजेंद्र खांदवे, प्रवीण कामठे, लोचन शिवले, वंदना काळभोर, बाबासाहेब काकडे, मारुती कुंजीर, रामभाऊ कुंजीर, तुकाराम पवार, सुभाष उंद्रे, भरत कुंजीर, अशोक खांदवे, जी. ब. चौधरी, उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन, लोणी काळभोरचे माजी सरपंच शरद काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, कमलेश काळभोर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माधव काळभोर पुढे म्हणाले, जुना कारखाना किंवा संपूर्ण नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कारखाना सुरू करण्यात येईल. नवीन कारखाना सुरू केला तर साखर उतारा वाढतो, बगॅस जास्त शिल्लक रहातो. नवीन कारखान्यात कामगारांचा पगार कमी लागतो. त्यामुळे कारखान्याला प्रतिवर्ष १० कोटींचा फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा बाजारभाव प्रतिटन २०० रुपयांनी जास्त देता येईल. कारखाना सुरू करण्याची ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केलेली आहे.
कारखाना सुरू करण्यासाठी बँकांशी चर्चा झाली आहे. केंद्र व राज्य सरकार, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल यांच्या मदतीने निधी उपलब्ध होणार आहे. फक्त आरोप करुन कारखाना सुरू होणार नाही. त्यामुळे आम्ही असल्या आरोपांकडे लक्ष न देता कारखाना सुरू करण्यावर भर दिला आहे, असे माधव काळभोर यांनी सांगितले.
विरोधक कारखाना सुरू करण्याऐवजी खोटे आरोप करीत आहेत. त्यांच्या बिनबुडाच्या आरोपांना आम्ही प्रत्युत्तर देणे टाळले आहे. विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत. खोटे आरोप करणे, हा त्यांचा या पाठीमागील हेतू आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनल निवडून आणण्यासाठी ‘पॅनल टू पॅनल’ मतदान करावे व किटली या चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन माधव काळभोर यांनी केले आहे. मतदारांचा कल आमच्या बाजूने आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय पक्का झाला आहे. दहा तारखेला आमच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे, असेही काळभोर यांनी सांगितले.
या वेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर म्हणाले, यशवंत सहकारी साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही संस्था हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांशी संबंधित महत्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत असताना मदत करणे, हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्य आहे. या संदर्भात तत्कालीन पणन संचालक अनिल कवडे यांनी प्रस्ताव दिला होता. कारखाना सुरु करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती भरीव मदत करणार आहे.
यावेळी बोलताना राजीव घुले म्हणाले, २०११ साली फक्त ३१ कोटी रुपये कर्ज यशवंत कारखान्यावर होते. तरीही यशवंत कारखाना प्रशासकाच्या ताब्यात दिला. महाराष्ट्रातील इतर अनेक सहकारी साखर कारखान्यांवर २०० कोटी कर्ज होते, तरी शासनाने प्रशासकाच्या ताब्यात दिले नाहीत. वन टाईम सेटलमेंट करुन हे कर्ज कमी होऊ शकते. त्यामुळे एक गुंठा जमीन न विकता आपण कारखाना सुरू करु शकतो.
मी नांदेड जिल्ह्यात एक साखर कारखाना यशस्वीपणे चालवत आहे. यशवंत कारखाना सुरु व्हावा म्हणून मी माझ्या तेथील अनुभवाचा उपयोग करणार आहे. या संदर्भात माधव काळभोर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. आगामी काळात यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करुन आम्ही चांगल्या पद्धतीने चालवू. या संदर्भात आवश्यक तेथे बँका, राज्य व केंद्र सरकार यांची मदत घेणार आहे.
यावेळी प्रविण कामठे, वंदना काळभोर, अंकुश कोतवाल, लोचन शिवले, संतोष कांचन, राजेंद्र खांदवे, रामदास चौधरी, रोहिदास उंद्रे, सुरेश घुले यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत काळभोर यांनी केले.