पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम कायम आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके हे शरद पवार गटात जात असावेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितले होते. त्यानुसार लंके यांनी गेल्या आठवड्यात पुण्यातील कार्यालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत लंके आणि शरद पवार या दोघांनी एक शब्दही काढला नाह . परंतु, लंके शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सर्वत्र आहे.
आमदार निलेश लंके यांनी सध्याच्या घडीला शरद पवार गटात जाण्याबाबत अथवा अजित पवार गटाविरोधात कोणतंही वक्तव्य केले, तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होऊ शकते. त्यामुळे आमदार निलेश लंके हे सावध पावित्र्यात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्याबाबत सूचक विधान केले आहे.
माजी मंत्री जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमदार निलेश लंके हे अहमदनगरमधील एक लोकप्रिय नेते आहेत. ते लोकसभेसाठी उभे राहिले तर शंभर टक्के निवडून येतील. लंके हेच आमचे उमेदवार असावेत, असं आमच मत आहे. त्याबाबत आवश्यक ते आम्ही योग्य वेळी पूर्ण करू. गेल्या आठवड्यात मी निलेश लंके यांना तुतारी भेट दिली होती. त्यांनी ती तुतारी घेतली आहे. परंतु, मी असं कोणतीही गोष्ट बोलणार नाही, ज्यामुळे निलेश लंके अडचणीत येतील, असंही पाटील म्हणाले.
पुढे जयंत पाटील म्हणाले, आमदार निलेश लंके यांनी तुतारी स्वीकारली की नाही? याबाबत मी कोणतेही भाष्य करणार नाही. कारण मला त्यांना अडचणीत आणायचं नाही. परंतु, मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की, आम्ही अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. यावेळी अहमदनगर लोकसभा जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही जयंत पाटील यांनी बोलून दाखवला.