लोणी काळभोर (पुणे): “यशवंत”ची आर्थिक परीस्थिती पहाता कारखाना सुरु करण्यासाठी गट-तट, गावकी-भावकीसह पक्षीय मतभेद दुर ठेवुन कारखान्याची निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी जेष्ठ नेते माधव काळभोर यांच्यासह तालुक्यातील नेते, कारखान्याचे सभासद व सर्वपक्षीय नेतेही प्रयत्नशील होते. मात्र, केवळ दोन व्यक्तींच्या अहंकारामुळेच सभासदांवर ही निवडणूक लादली गेली. सत्तर टक्क्यांहून अधिक सभासद पाठीशी असल्याने, ही निवडणुक एकतर्फी होणार आहे. ऊस उत्पादक सभासदांचे हित व हवेलीची अस्मिता लक्षात घेऊन, पुढील काही महिन्यांतच कारखाना सुरु करुन दाखणारच, असे आश्वासन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी लोणी काळभोर हद्दीतील रायवाडी परीसरात दिले.
“यशवंत”च्या संचालक मंडळाची निवडणुक येत्या नऊ मार्च रोजी होत असून कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव अण्णा काळभोर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल” निवडणुक लढवत आहे. या पॅनेलच्या प्रचारासाठी दिलीप काळभोर व त्यांचे सहकारी रायवाडी परीसरात आले असता, दिलीप काळभोर यांनी वरील आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित सभासद मतदारांबरोबर बोलताना दिलीप काळभोर म्हणाले, निवडणूक जाहीर झाल्यापासूनच निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्व शेतकरी व सभासद बांधवांची इच्छा होती. कारखान्याची निवडणूक झाली तर आपापसातले गट-तट व राजकीय वैमनस्यामुळे कारखाना सुरू करण्यात अडचणी येऊ शकतात, हे ओळखूनच माधव आण्णा काळभोर, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर व आम्ही बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. कारखाना सुरू करायचा असेल, तर गट-तट आणि भेदभाव विसरून सर्व समावेशक सर्वपक्षीय बिनविरोध संचालक मंडळ निवडून जाणे गरजेचे आहे, याची जाणीव आम्हाला झाली म्हणून आम्ही स्वतःपासून सुरुवात केली. लोणी गावातील पारंपरिक विरोधक असताना देखील माधव आण्णा काळभोर व आम्ही सर्व मंडळी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
दिलीप काळभोर पुढे म्हणाले, लोणी काळभोर परीसरातील सभासद आणि नेते बिनविरोधसाठी तयार होताच, संपूर्ण तालुक्यातील विविध गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवर जाऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ बैठका घेतल्या. प्रामुख्याने गुलमोहर कार्यालय येथील “निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे ”चर्चासत्र” ज्यामध्ये उमेदवारी अर्ज भरलेले सर्व इच्छुक उमेदवार, तालुक्यातील सर्व नेते मंडळी व शेतकरी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध झाली तर याचे श्रेय आम्हाला जाईल म्हणून तालुक्यातील अतिमहत्वकांक्षी व अहंकारी अशा दोन नेते मंडळींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तरीही आम्ही कारखान्याचे हित व तालुक्याची अस्मिता लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करतच होतो. निवडणूक बिनविरोध झाली व कारखाना सुरु झाला तर याचे श्रेय आम्हाला जाईल म्हणून वरील दोन नेत्यांनी प्रत्येक मीटिंगमध्ये जाणूनबुजून गोंधळ घालून आमच्या प्रयत्नांना खो घातला. स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी यांनी संपूर्ण कारखान्याच्या 21000 हजार सभासदांवर ही निवडणूक लादली. सभासद वरील दोन्ही नेत्यांना कधीच माफ करणार नाहीत.
यावेळी दिलीप काळभोर यांच्या समवेत असलेले महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर म्हणाले, निवडणुक बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेमध्ये दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माऊली कटके यांनी मध्यस्थी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आमच्या समवेत माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, बापूसाहेब पठारे, कारखान्याचे माजी अध्यक्ष के. डी. कांचन, देविदास भन्साळी, प्रकाश मस्के, सुरेश घुले, प्रताप गायकवाड, सोपान कांचन, विकास दांगट, महादेव कांचन, राजीव घुले, पांडुरंग काळे, संदीप भोंडवे, माणिकराव गोते, रोहिदास उंद्रे रामभाऊ कुंजीर, मारुती कुंजीर, तात्यासाहेब काळे, महेंद्र पठारे कुशाभाऊ गावडे, रघुनाथ चौधरी, बाबासाहेब काकडे, राजेंद्र टिळेकर, राजाराम कांचन, गुलाब चौधरी, तुकाराम पवार, सुदर्शन चौधरी, सुभाष आप्पा काळभोर, विलास अण्णा काळभोर इत्यादी तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नेते मंडळींनी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले .
राहुल काळभोर पुढे म्हणाले, निवडणुक जिंकण्याची खात्री असतानाही ऊस उत्पादक सभासदांचे हित व हवेलीची अस्मिता लक्षात घेऊन बिनविरोध निवडणुकीसाठी पंधरा दिवस सकाळी नऊ ते रात्री बारा अशा बारा ते पंधरा तास बैठका घेतल्या. विरोधकांची मनधरणी केली व वेळप्रसंगी विनवणी केली. उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमचे प्रयत्न सुरू होते, तरी काही नतदृष्ट मंडळींनी यामध्ये डाव साधला व निवडणूक लावली. तालुक्यातील जनतेने आमचे प्रयत्न पाहिलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सभासद मंडळी यांना धडा शिकवणार आणि रयत सहकार पॅनलला बहुमताने विजयी करणार, असा मला विश्वास आहे, असं देखील काळभोर म्हणाले.