लोणी काळभोर (पुणे): यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आम्ही कारखाना सुरु करु शकतो, याची खात्री पटल्याने सभासदांनी संचालकांच्या एकवीसपैकी आमच्या पॅनेलला अठरा जागा देत आमच्यावर विश्वास दाखवला आहे. उर्वरित तीनही जागा अगदी थोड्या फरकाने गेल्या आहेत. साखर उत्पादक सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून या पुढील काळात कारखाना सुरु करण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करु, अशी ग्वाही अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख तथा हवेली बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रकाश जगताप यांनी थेऊर येथे दिली.
दरम्यान “यशवंत” सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी उद्या (बुधवारी) राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची नवनिर्वाचित संचालकांच्या समवेत भेट घेणार आहे. त्यानंतर कारखाना सुरु करण्यासाठी नेमकी काय पाऊले उचलावी लागतील, याबाबत पत्रकारांसोबत सविस्तर बोलणार असल्याचेही प्रकाश जगताप यांनी यावेळी जाहीर केले.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी निवडणुक शनिवारी पार पडली. या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर व हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला एकवीसपैकी तब्बल अठरा जागा मिळाल्या आहेत. दरम्यान आज (मंगळवारी) दुपारी प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळाने कारखान्याला भेट दिली. यावेळी सर्वांनी कारखान्याचे संस्थापक अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना प्रकाश जगताप यांनी वरील माहिती दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास दांगट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते कृषीराज चौधरी, आबा काळे, राहुल काळभोर यांच्यासह कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक संतोष आबासाहेब कांचन, सुनिल सुभाष कांचन, सुशांत सुनिल दरेकर, शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी, ताराचंद साहेबराव कोलते, योगेश प्रल्हाद काळभोर, मोरेश्वर पांडुरंग काळे, अमोल प्रल्हाद हरपळे, राहुल सुभाष घुले, किशोर शंकर उंद्रे, रामदास सिताराम गायकवाड, सुभाष चंद्रकांत जगता, हेमा मिलींद काळभोर, रत्नाबाई माणिक काळभोर दिलीप नाना शिंदे, मोहन खंडेराव म्हेत्रे, कुंडलिक अर्जून थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश जगताप म्हणाले, महाराष्ट्र सरकारने पुणे जिल्ह्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील एकवीस कारखान्यांना थकहमी कर्ज देणार असल्याची चर्चा आजच सुरु झाली आहे. याबाबतचा निर्णय उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे. थकहमी मिळणाऱ्या यादीत आपल्या “यशवंत”चे नाव नसले तरी, यापुढील काळात राज्य शासनाकडून कारखाना सुरु करण्यासाठी मदत कशी मिळवता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी उद्या (बुधवारी) राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची नवनिर्वाचित संचालकांच्या समवेत भेट घेणार आहे. त्याचबरोबर उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक व जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह सर्वच वरीष्ठ नेत्यांची भेट घेणार आहोत. तसेच हर्षवर्धन पाटील व राहुल कुल यांच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन त्यांनाही मदतीचे आवाहन करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले, यापुढील काळात आमदार राहुल कुल व हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्सिट्युटची मदत घेऊन कारखाना लवकरात लवकर कसा सुरु करता येईल, याची चाचपणी केली जाणार आहे. ऊस उत्पादक सभासदांचे हित सर्वाधिक महत्वाचे असल्याने सभासदांनी निवडून दिलेले सर्व संचालक कारखाना सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतील, असा विश्वासही काळभोर यांनी यावेळी व्यक्त केला.