लोणी काळभोर, (पुणे) : यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीला उन्हाची चाहूल लागताच, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे नागरिक पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ही दोन्ही गावे शहरालगत असल्याने या दोन्ही गावांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांच्या ठिकाणी दीड लाखाहून अधिक लोकसंख्या राहत आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी पडला आहे. दोन्ही ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या विहिरीतून पाणी उपसून गावांना पिण्यासाठी पुरविले जाते.
मुळा मुठा कालव्याला पाणी असल्यानंतर या विहीरींना भरपूर पाणी असते. कालव्याला पाणी नसल्यास या सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी लक्षणीयरित्या कमी होते. त्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. कालव्याला जर महिन्यापेक्षा जास्त काळ पाणी नसल्यास बहुतेक विहीरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर असतात. सद्यस्थितीत पाण्याचे काही स्त्रोत कोरडे पडले आहेत. तर काहींचा पाणीसाठा अल्प प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
दरम्यान, हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना उजव्या मुठा कालव्यामधून पाणी पुरवठा होतो. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणातील पाणी नवा मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला व नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीला उपलब्ध होणारे पाणी फार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
शेतीसह पिण्याच्या पाण्याची कमतरता
पूर्व हवेलीत शेतीला पाण्याची कमतरता सुरु झाल्याने, अगोदरच हजारो एकर क्षेत्रावरील पिके धोक्यात आलेली आहेत. याबबरोबरच आता नागरिकांना पिण्याची पाण्याची कमतरता भासू लागली आहे. तर ग्रामपंचायतीच्या वतीने दिवसाआड सुमारे अर्धा तास पाणी सोडण्यात येत आहे. शेतीसह पिण्याची पाण्याची कमतरता भासू लागल्याने शेतकऱ्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.
खासगी टॅंकरशिवाय पर्याय नाही
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांमधील लोकसंख्या वाढली असून, कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. तर या भागातील सोसायट्यांना खासगी टॅंकर घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. साध्या पाण्याच्या टॅंकरची किंमत ९०० ते १००० हजार रुपये आहे. यामुळे नागरिकांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पाणीटंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा
घरामध्ये पाणी पिण्याच्या व्यतिरिक्त वापरासाठीही लागते. पाणी दोन दिवसातून एकदा आणि ते पण फक्त अर्धा तास पाणी येत असे तर घरातील खूप कामे राहतात. एकीकडे विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे मात्र आज ही पिण्याच्या पाण्याची किती गंभीर समस्या आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे व पाणीटंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.
पल्लवी गायकवाड (कदमवाकवस्ती, ता. हवेली)
उन्हाळ्यात सोसायटीमधील बोअरवेलचे पाणी आटले आहे. खासगी टॅंकर वेळेवर मिळत नाहीत. सभासदांकडून मिळणारा मेन्टेनन्स आणि पाण्यावर होणारा खर्च याचे समीकरण जुळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने उन्हाळ्यात गावांमधील सोसायट्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.
आकाश कुलकर्णी (लोणी काळभोर, ता. हवेली)