गणेश सुळ
दौंड : दौंडच्या ग्रामीण भागातील गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये बोरीबेल, गाडेवाडी, खडकी, देऊळगाव राजे, म्हसनेरवाडी आदी परिसराचा समावेश आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने या सर्वच परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये कलिंगड, काकडी, खरबूज अशा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. परंतु पाण्याअभावी सर्वच पिके करपून जात आहेत. उन्हाळा सुरू झाला की दौंड तालुक्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई उग्र रूप धारण करत असते. परिणामी याचा मोठा फटका हा शेतकरी वर्गाला बसतो आहे. दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण कमी कमी होत असल्याने पिकांना पाणी देण्यास मर्यादा पडू लागल्या आहेत.
प्रतिकूल वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसत आहे. टँकरचे पाणी पुरत नाही आणि पाणी द्यावे म्हटले तरी ते आणावे कोठून, हा प्रश्न कांदा उत्पादकांसमोर आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांवर कांद्याचे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे.
पीक समोर दिसत असताना पाण्याअभावी शेतकरी पिके सोडून देत आहेत. काहींनी कूपनलिका खोदत पाणी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातही अपयश आले. अमाप खर्च करून शेतमालाचे उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते विस्कटली आहेत.
दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामधील खोर, देऊळगावगाडा, नारायण बेट, माळवाडी, पडवी या गावांना उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईचा मोठा फटका बसत असतो. सद्य:स्थितीत खोर परिसरात पाणी टंचाईची समस्या भेडसावण्यास सुरुवात झाली असून, या परिसरातील ओढे, नाले, विहिरी, तलाव हे पूर्णतः आटले आहेत. या भागात अंजिराच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, सध्या पाणी कमी पडल्याने अंजिराचा हंगाम धोक्यात आला आहे. अंजिराचा खट्टा बहार हा हंगाम संपला असून, यापुढे जानेवारी ते मे दरम्यान अंजिराचा मिठा बहार घेतला जातो; मात्र, ऐन हंगामाच्या कालावधीतच पाणी संपुष्टात आल्याने शेतकरी चिंतेत आहे.
दरम्यान, या भागातील शेतकर्यांनी जनाई-उपसा योजनेतून पद्मावती व पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलावात आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. सध्या अंजीर बागेला पाणी कमी पडल्याने अंजीर उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यापुढील मिठा बहाराचा हंगाम पूर्ण होण्यावर पाण्याअभावी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.