पुणे: धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे रविवारपासून (दि. २१) धरणातून शेतीसाठी खरीप आवर्तन सोडण्यात आले आहे. नवीन मुठा उजवा कालव्यात सायंकाळपर्यंत ५०० क्युसेक विसर्ग करण्यात आला, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
खडकवासला धरणसाखळीत पाऊस सुरू असल्याने प्रकल्पातील पाणीसाठा १४.०४ टीएमसी झाला आहे. तर खडकवासला धरण ७३.५३ टक्के भरले आहे. जूनअखेरीस हा पाणीसाठा ३.५० टीएमसीपर्यंत होता. मात्र, मागील तीन आठवड्यांत चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जवळपास दहा टीएमसी पाणी वाढले, तर खडकवासला धरण भरण्याच्या मार्गावर आहे.
मागील २४ तासांत पावसामुळे खडकवासला १.४५ टीएमसी (७३.५३ टक्के), पानशेत ५.८९ टीएमसी (५५.३२ टक्के), वरसगाव ५.३५ टीएमसी (४१.७० टक्के) तर टेमघर धरणात १.३५ टीएमसी (३६.५० टक्के) पाणीसाठा आहे. पाण्याची वाढ सातत्याने होत असल्याने पाणी नदीत सोडण्याऐवजी कालव्यातून सोडण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता ३०० क्युसेक विसर्ग करण्यात आला तर सायंकाळी ७ वाजता तो ५०० क्युसेक इतका करण्यात आला. विसर्गामुळे हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यांतील शेतीला खरीप आवर्तनाच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे.