लोणी काळभोर (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील ऐतिहासिक माधवराव पेशवे वाड्याची भिंत पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता गुप्त धनासाठी पाडल्याचा आरोप सारिका सिद्धार्थ कांबळे यांनी केला असून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी. तसेच अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे श्री चिंतामणी गणपती मंदिर आहे. महाराष्ट्र शासनाने या गावाला तीर्थक्षेत्र ‘ब’चा दर्जा दिलेला आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. या गावामध्ये माधवराव पेशवे हे त्यांच्या कुटुंबासह काही काळ वास्तव्यास होते. तसेच मुळामुठा नदी किनारी रमाबाई पेशवे यांचे समाधीस्थळसुद्धा आहे. थेऊर गावामध्ये पेशव्यांनी श्री चिंतामणी मंदीर व पेशवेवाड्याची उभारणी केलेली आहे.
सारिका कांबळे यांनी पुरातत्व विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, श्री चिंतामणी गणपती मंदिराचे पुजारी मंगलमुर्ती विनायक आगलावे, अजय विश्वास आगलावे या दोघांनी गुप्त धनाच्या लालसेपोटी ११ मे २०२४ रोजी रात्रीच्या वेळेस तांत्रिक विधी, जादू टोणा, लिंबू मिरची, हळदी कुंकु अशा गोष्टींचा वापर करून पेशवेकालीन भिंत पाडली आहे.
दरम्यान, वास्तविक सदर भिंत ही पेशवेकालीन असल्यामुळे त्या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी योग्य त्या अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु, मंगलमुर्ती आगलावे व अजय आगलावे यांनी कुठलीही परवानगी न घेता पेशवेकालीन भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडून उत्खनन केले आहे. सदर इसमांनी गावामध्ये कोणाबरोबरही सल्ला मसलत न करता रात्री गुप्त धनाच्या लालसेपोटी भिंत पाडून उत्खनन केले आहे. या जागेमध्ये ते इमारतीचे बांधकाम करणार आहेत. सदर इसमांना खूप मोठ्या प्रमाणात गुप्तधन मिळाले असल्याची शक्यता सारिका कांबळे यांनी त्यांच्या तक्रारीत व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिराचे पुजारी मंगलमुर्ती आगलावे व अजय आगलावे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.