बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. यावरून बारामतीमध्ये शरद पवार यांचीच पॉवर असल्याचे दिसून आले. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी दणदणीत पराभव केला. बारामती लोकसभा निवडणूक दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठा पणाला लावणारी होती. त्यात मात्र शरद पवार यांनी बाजी मारली. यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांचा विधानसभेत कस लागणार आहे. त्याचवेळी शरद पवार गटाकडूनही विधानसभेची तयारी सुरु केली गेली आहे. अजित पवार यांना डिवचणारे बॅनर्स बारामतीमधील सुपामध्ये लावण्यात आले आहे. ‘वादा तोच दादा नवा’, असे बॅनर्स लावले आहे. त्यात बारामतीचा नवीन दादा म्हणून युगेंद्र पवार यांच नाव पुढे येऊ लागले आहे. यामुळे विधानसभेत पुन्हा पवार गटात लढाई जुंपणार असे चिन्ह आहेत. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी ही लढत असणार आहे. युगेंद्र पवार अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहे.
युगेंद्र पवार तयारीत?
युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू आहे. त्यातच आता बॅनर लावल्याने चर्चांना अधिकच उधाण आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहे. बॅनरवर लिहिलेल्या मजकुरावरून अजित पवार यांना डिवचले आहे. दरम्यान युगेंद्र पवार नेहमीच अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. रोहित पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. यामुळेच लोकसभेनंतर विधानसभेत आता काका-पुतण्याची लढत रंगणार आहे.
अभिनंदनातून साधला निशाणा
सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बारामतीमधील सुपा येथे बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनर्सवर ‘वादा तोच दादा नवा’ असे लिहिले असून युगेंद्र पवार यांचा फोटो देखील लावला आहे. तसेच “हर वाल का पलटवार हुं मै, युही नही कहलाता शरद पवार हुं मै ” असे वाक्य लिहून सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. या बॅनर्सची सद्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.