पुणे : शहरातील मुठा नदीपात्रात तब्बल ५५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ओंकारेश्वर मंदिर ते वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाटाला जोडणारा जुना पूल पाडण्यात येणार आहे. सर्व बाबींचा अभ्यास करून याबाबतचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने शहर सुधारणा समितीत मंजुरीसाठी ठेवला आहे.
ओंकरेश्वर मंदिर ते वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाटाला जोडणाऱ्या नदी पात्रातील पुलाची लांबी ५० मीटर, तर रुंदी अवघी ४.७ मीटर आहे. या पुलाचा वापर स्थानिक नागरिक नदी ओलांडणे, वाहने धुणे, मासे पकडणे, प्राण्यांची स्वच्छतेसाठी करतात. वाहतुकीसाठी या पुलाचा वापर होत नाही.
हा पूल धोकादायक झाला असून, पावसाळ्यात मुठा नदीपात्रातील दरवर्षी जलपर्णी आणि कचरा अडकला जातो. त्यावर वारंवार खड्डे पडत असून त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पुलाचे ऑडिट केले होते. त्यात या पुलाची दुरुस्ती केल्यास ३९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
दुरुस्तीनंतर त्याचे आर्युमान केवळ ८ वर्षे वाढणार आहे. या पुलाच्या बांधकामानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि जयंतराव टिळक पूल बांधण्यात आला. हे दोन्ही पूल वापरत असल्याने तसेच दुरुस्तीनंतर कॉजवेचा फारसा वापर होणार नसल्याने हा पूल पाडला जाणार आहे. हा पूल पाडल्यानंतर त्याचा फायदा महापालिकेच्या नदीकाठ विकसन प्रकल्पासह पूरस्थितीच्या काळातही होणार आहे.