लोणी काळभोर (पुणे): हवेली तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या थेऊर येथील “यशवंत” सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बहुप्रतिक्षीत निवडणुकीसाठी प्रत्यक्षात मतदान उद्या (शनिवारी) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. “यशवंत”ची सत्ता आपल्याच गटाच्या ताब्यात यावी, यासाठी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व पुर्व हवेलीचे जेष्ठ नेते माधव अण्णा काळभोर आणि हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक प्रकाशदादा जगताप या दोघांनीही आपआपल्या पध्दतीने “रणनिती” आखली आहे. निवडणुकीत कारखान्याचे साडे तेरा हजारांहून अधिक सभासद “अण्णा” की “दादा”ना झुकते माप देणार, ते उद्या मतपेटीत बंद होणार आहे.
बिनविरोध निवडणुकीच्या आशा मावळताच मागील आठ दिवसांपासून “यशवंत”ची सत्ता आपल्याच गटाच्या ताब्यात यावी, यासाठी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन पॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. सत्तेच्या रणांगणात उतरलेल्या दोन्ही पॅनेलप्रमुखांनी हायटेक प्रचार यंत्रणेबरोबर साम, दाम व दंड ही आयुधे वापरली आहेत. प्रचार यंत्रणा जोरदार राबवली असली तरी, उद्या दिवसभरात मतदार राजाला कोणता पॅनेल मतदान बुथपर्यतं आणत आपल्याच पॅनेलसाठी मतदान करुन घेतो, यावरच विजयाची गणिते ठरणार आहेत.
अण्णासाहेब मगर यांनी उभारलेल्या “यशवंत” कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक यापुर्वी 2006 साली झाली होती. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने आर्थिक अनियमतेतेचा ठपका ठेवत तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करुन कारखान्याचा कारभार प्रशासकाच्या हाती दिला होता. २०११ मध्ये तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर ही निवडणूक होण्यासाठी अनेक अडथळ्यांना पार करावे लागले आहे. कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी उद्या मतदान होत आहे. निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलचे ४२ उमेदवार वगळता आणखी १२ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलच्या प्रचार सांगता सभा गुरुवारी सायंकाळी पार पडल्या. प्रचाराच्या सांगता सभा भव्यदिव्य व्हाव्यात, यासाठी पॅनेल प्रमुखांनी केलेली तयारी व दोन्ही सभांना नागरीकांसह सभासदांचा मिळालेला प्रतिसाद पहाता, उद्याची निवडणुक चुरसीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कारखान्याचे एकुन गट सहा असुन, गटनिहाय विचार केल्यास गट क्रमांक एकमधील तीन जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज, गट क्र २ मधील ३ जागांसाठी ८ उमेदवारी अर्ज, गट क्र ३ मधील ३ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज, गट क्र ४ मधील २ जागांसाठी ४ उमेदवारी अर्ज, गट क्र ५ मधील २ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज व गट क्र ६ मधील २ जागांसाठी ५ उमेदवारी र्ज रिंगणात राहिले आहेत. ब वर्ग म्हणजेच उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक व पणन संस्था (ब वर्ग) गटात १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज, महिला राखीव गटात २ जागांसाठी ४ उमेदवारी अर्ज, अनुसूचित जाती जमाती गटात १ जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज, इतर मागासवर्गीय गटात १ जागेसाठी ५ उमेदवारी अर्ज, विमुक्त जाती जमाती गटात १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज रिंगणात राहिले आहेत.
कारखान्याची सत्ता आपल्याच गटाला मिळावी, यासाठी “रयत सहकार पॅनल”च्या माध्यमातून माधव काळभोर, दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील आठ दिवसाच्या काळात जीवाचे रान केलेले आहे. तर दुसरीकडे कारखान्याची सत्ता माधव काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळू नये, यासाठी प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, बाळासाहेब चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या पद्धतीने फिल्डींग लावल्याचे दिसून आले आहे. दोन्ही पॅनेलकडे अनेक मातब्बर नेते व उमेदवार असल्याने ही निवडणुक अंत्यत चुरसीची बनल्याचे अखेरच्या टप्प्यात दिसून आले.
आर्थिक अनियमितेमुळे मागील तेरा वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात पॅनल प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते माधव काळभोर, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, महादेव कांचन, प्रताप गायकवाड, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर हे सहकारातील प्रमुख नेते, तर कारखान्याचे उमेदवार म्हणून कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे, कारखान्याचे माजी संचालक राजीव घुले, माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक काळभोर यांचे चिरंजीव सागर काळभोर, माजी संचालक महादेव कांचन यांचे चिरंजीव अजिंक्य कांचन, माजी संचालक सुभाष जगताप, संतोष आबासाहेब कांचन, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, फुरसुंगीचे अमोल हरपळे, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे असे अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने, ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
कारखान्याच्या मतदारांचा विचार केल्यास, कारखान्याचे कागदोपत्री एकवीस हजार सभासद असले तरी, त्यापैकी सात हजारांहून अधिक सभासद मयत आहेत. कारखान्याचे कामकाज मागील १३ वर्षांपासून बंद असल्याने नवीन पिढीची वारस नोंद होऊ शकली नाही. त्यामुळे १८ ते २४ या वयोगटातील एकही तरुण कारखान्याचा सभासद नाही, पर्यायाने मतदानाचा अधिकार त्यांना नाही. २५ ते ३९ या वयोगटातील फक्त २५३ (फक्त १ टक्के) मतदार आहेत. ४० ते ५९ या वयोगटातील ५८०१ (२८ टक्के) मतदार आहेत. तर ६० वर्षांवरील १३६८३ (६५ टक्के) मतदार आहेत. म्हणजे ६० वर्षांवरील मतदारांचा कल ज्या पॅनेलकडे झुकणार आहे, तो पॅनेल सहजपणे निवडून येणार आहे. साधारण ४० वर्षांच्या पुढील जितके जास्त मतदार जो पॅनेल आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होईल, त्यांच्या गळ्यात विजयश्री माळ पडणार, हे सत्य आहे. १३५७९ मतदार या निवडणुकीत मतदान करु शकतील. यापैकी किती मतदार आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडतील, त्यावरच कोणता पॅनेल निवडून येणार हे ठरणार आहे.