Gram Panchayat Election 2023 : पुणे : पुणे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायती आणि इतर 142 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकींसाठी आज (रविवारी) मतदान होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४९ सरपंचांची आणि ८४९ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यात ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आज होत असलेल्या निवडणुकीत प्रशासनाने तयारी केली.
जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या २३१ ग्रामपंचायत व १४२ ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. निवडणूक प्रक्रियेनुसार २३१ ग्रामपंचायतींमधील दोन हजार ४० सदस्यपदांसाठी निवडणूक होणार होती. माघारीच्या मुदतीनंतर ८४९ सदस्यांची निवड बिनविरोध झाली. त्यामुळे १८४ ग्रामपंचायतींमधील एक हजार १३२ सदस्यांची निवड मतदारानंतर निश्चित होणार आहे. ५९ सदस्यपदांसाठी एकही अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. त्यात सर्वाधिक २४ जागा आंबेगाव तालुक्यातील आहेत, भोर तालुक्यात १७, तर मुळशी तालुक्यातील नऊ सदस्यांची पदे रिक्त राहतील.
मुळशी, वेल्हे व भोरमध्ये सरपंचपद रिक्त राहणार
वेल्हे, मुळशी व भोर तालुक्यांतील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीमधील सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. ४९ ठिकाणी सरपंचपद बिनविरोध झाले आहे. भोर तालुक्यातील सर्वाधिक १३ ठिकाणी सरपंचपद बिनविरोध झाले आहे. आंबेगाव तालुक्यात नऊ, खेड तालुक्यात आठ, जुन्नर तालुक्यात सहा, मुळशीत चार, दौंड व बारामतीत प्रत्येकी एक आणि पुरंदरमध्ये तीन ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद बिनविरोध झाले आहे.
जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती बिनविरोध
जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक 12 ग्रामपंचायती भोर तालुक्यातील असून, मावळमधील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मुळशी, आंबेगाव व पुरंदरमध्ये प्रत्येकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.