लोणी काळभोर: शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात आज (दि. २०) शांततेत व मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. अपवाद वगळता कुठेही वादाचे गालबोट लागले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला. प्रचाराच्या रणधुमाळीत करण्यात आलेल्या आरोप – प्रत्यारोपांमुळे उत्तरोत्तर रंगतदार होत गेलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार राजाने आपले बहुमुल्य मत देवून आमदार पदासाठी उभ्या असलेल्या ११ उमेदवारांचे नशीब आज मतदान यंत्रात बंद केले.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघांत यंदाच्या निवडणुकीमध्ये पारंपारिक प्रचाराला आधुनिकतेची जोड देण्यात आल्यामुळे प्रचाराची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) विद्यमान आमदार अशोक पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्ञानेश्वर कटके या उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून आरोप प्रत्यारोप करत मतदान करण्याचे आवाहन केले होते.
आपल्याच पक्षाला जास्तीत जास्त मतदान मिळावे, यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळपासूनच धावपळ करताना दिसत होते. बहुतांश मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. अपंग व वृध्द मतदारांनीही मतदान केले. सायंकाळी ६ वाजता मतदानाची वेळ संपली, त्यावेळीही मतदार मतदानासाठी येत होते.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात ४६६०४२ मतदार आहेत. यामध्ये २४१७८७ पुरुष मतदार, २२४२३२ महिला मतदार, तर २३ तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण ४५७ मतदान केंद्रावर या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदारांपैकी शिरूर तालुक्यात २१३४०३ मतदार असून त्यामध्ये १०८०७७ पुरुष मतदार, तर १०५३१६ महिला मतदार आणि १० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. हवेली तालुक्यात २५२६३९ मतदार असून त्यापैकी १३३७१० पुरुष मतदार, तर ११८९१६ महिला मतदार आणि १३ तृतीयपंथी मतदार आहेत. शिरूरपेक्षा हवेली तालुक्यात ३९,२३६ मतदार जास्त आहेत. या मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणूक लढवत असले तरी मुख्य लढत अशोक पवार व ज्ञानेश्वर कटके यांच्यात होत आहे.
बऱ्याच मतदान केंद्रावर नियोजनाचा अभाव दिसत होता. मतदानासाठी सकाळपासुनच गर्दी होती. दुपारी मतदानाचा वेग खूपच मंदावला होता. दुपारी चार नंतर परत मतदानाचा वेग वाढला. बहुतेक मतदान केंद्रावर प्रक्रिया हळूहळू सुरु होती. त्यामुळे मतदान करण्यासाठी वेळ लागत होता. बहुतांश ठिकाणच्या मतदारांना उन्हात एकते दीड तास रांगेत उभे रहावे लागत होते. कर्मचारी, अधिकाऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते, तर मतदारांना पिण्याचे पाणी कुठून मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामीण भागातील बहुतेक मतदार शेतीत काम करतात. दीड तास रांगेत उभे रहाण्यापेक्षा या मतदारांनी मतदान न करता माघारी घरी जाणे पसंत केले. त्यामुळे टक्केवारी कमी होणार आहे.
गावनिहाय झालेले मतदान (कंसात टक्केवारी)
1) लोणी काळभोर – 14563(67.11%)
2) कदमवाकवस्ती -12250 (63.99%)
3) कुंजीरवाडी – 4713 (74.80%)
4)थेऊर -5962 (69%)
5)आळंदी म्हातोबाची – 3521 (72.27%)
6)तरडे – 1425 (80.28%)
7)उरुळी कांचन – 15707 (60.29%)
8)नायगाव – 1828 (81.57%)
9)पेठ – 1398 (77.49%)
10)प्रयागधाम – 1056 (60.55)
11)कोरेगाव मूळ – 2544 (65.78%)
12)सोरतापवाडी – 3459 (67.82%)
13)वळती – 1217 (70.20%)
14)शिंदवणे – 2456 (73.37%)
15)भवरापूर – 508 (81%)
16)टिळेकरवाडी – 996 (74%)
17) लोणी कंद – 4895 (67.48%)
18) न्हावी सांडस – 1046 (79.90%)
19) सांगवी सांडस – 827 (78%)
20) अष्टापूर – 2116 (76%)
21) शिंदेवाडी – (77.80%)
22) खामगाव टेक – 531 (75.42%)
23) केसनंद – 8360 (73%)
24) वाडे बोल्हाई – 2900 (72.5)
25) शिरसवडी – 1225 (77%)
26) भिवरी – 721 (76.70%)
27) कोलवडी – 4778 (73%)
28) साष्टे – 1026 (80%)
29)हिंगणगाव 1105 (80.48)
30) वाघोली – 39583 (58.50%)
31) डोंगरगाव – 1799 (76%)
32)शिंदेवाडी – 904 (77.80%)