युनूस तांबोळी
राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी झालेली उलथापालथ पाहता जो तो स्वार्थासाठी राजकारण करत असलेला पहावयास मिळत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वसामान्य माणसाला वेडे बनविण्याचे काम केले जात आहे. निवडणुका आल्यावर तुमच्या सतरंज्या उचलू; पण आम्ही तुमचाच जयजयकार करू. महागाई, बेरोजगारी वाढवा, आम्ही काही बोलणार नाही. निवडणुका आल्या की नेत्याचा कार्यकर्ता म्हणून मिरवायचे. निवडणुकीत मिळणारा रोजगार आणि जेवणावळीवर आमचाच हक्क असल्यासारखं वागायचं. पैसे घेऊन मत दिल्यावर नेत्याने मात्र पाच वर्षे फिरकायचे देखील नाही, की तुमच्या समस्या जाणून पण घ्यायच्या नाहीत. हे सारं घडतय, पण याला जबाबदार कोण? याचा मतदाराला विसर पडत चालला आहे. मतदारांनो जागे व्हा… आता तरी शहाणे व्हा… आपल्या हक्काचे सरकार तुम्हीच ठरवा…
प्रश्नांना वाचा फोडण्याची हीच योग्य वेळ…
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तसे सगळे मतदारसंघ आणि नेते, कार्यकर्ते जागे झाले. पायात पाय अडकून सत्तेसाठी वेगळी भूमिका घेणारे आपल्या घरच्या मतदारसंघाकडे लक्ष देऊ लागले आहेत. ग्रामपंचायत, स्थानिक संस्था, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यावर वर्चस्व असणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या चांगलीच धादंल उडाली आहे. त्यामुळे नेत्यांच्या निवडणुकीत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भविष्यातील निवडणुकीतले स्थान अढळ करण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ पहायला मिळत आहे. बेरोजगार म्हणून मिरवणारा तरुण आजही त्यांच्यामागे धावताना दिसू लागला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत बेरोजगारी हटविण्याची भाषा करणारे मात्र नवीन आश्वासन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. हीच वेळ आहे, त्या-त्या नेत्याला बेरोजगारी, महागाई, बाजारभाव याबाबतचा सवाल करण्याची. त्यामुळे तरूणांनो जागे व्हा. किती बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली, महागाई कमी का झाली नाही, शेतमालाला बाजारभाव का मिळाला नाही, अशा प्रश्नांना वाचा फोडण्याची.
तरुणांनी लोकसभेसाठी उमेदवार व्हावे…
राज्यात नोकरीसाठी भटकंती करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. एखाद्या विभागात बोटावर मोजण्याइतपत जागा नोकरीसाठी शिल्लक असतील, तरी लाखोंच्या संख्येने तरुण नोकरीसाठी अर्ज करतात. या प्रक्रियेमध्ये करोडो रूपये जमा होतात. तुटपुंज्या पगारात नोकरी करण्यासाठी मोठा तरुणवर्ग प्रतिक्षेत असताना पहावयास मिळतो. मात्र, राजकारण गलिच्छ असे समजून हाच तरुण वर्ग राजकारणाकडे पाठ फिरवतो. संविधानाने दिलेला हक्क व कर्तव्य बजावतानाच तरुण वर्गाने राजकारणात उतरणे गरजेचे आहे. उद्याचा लोकसभेचा उमेदवार तुमच्यातीलच असला पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवार म्हणून मिरवायला काय हरकत आहे? उद्या संसदरत्न पुरस्कार तुम्हीही मिळवू शकता. गावागावांतून दोन उमेदवारांनी लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार म्हणून सहभाग घेतला पाहिजे. त्यातून केवळ सत्ता उपभोगण्यासाठी एकत्र येणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या ‘दूर’दृष्टीला आळा बसेल.
कुठलं सरकार आणायचं हे तुम्हीच ठरवा….
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे काही मागू नका. सरकार कोणते निवडून आणायचे हे ठरवा. अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात अभिनेते नाना पाटेकर म्हणतात की, चांगले दिवस येतील याची वाट पाहू नका, जिद्दीनं चांगले दिवस आणावे लागतील. राजकारणात जाण्याच्या चर्चांवर त्यांनी म्हटले की, माझ्या पोटात जे आहे, तेच ओठांवर येते. त्यामुळे मला राजकारणात जाता येत नाही. दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून, महिन्याभरात सगळे पक्ष संपतील, मग कशाला जायचं? शेतकऱ्याचं अख्खं आयुष्य आभाळाखाली असतं. त्यांच्या पिकाला तिजोरी नसते. पाखरं खातात, वानरं येऊन खातात. उरलेलं आम्ही खातो. मात्र, त्याचा जो रास्त भाव आहे, तो आम्हाला द्या. त्याच्या पलिकडे आम्ही काय मागतोय. सोन्याचा भाव कित्येक पटीत वाढला. मात्र, गव्हाचा, तांदळाचा भाव काय पटीत वाढला तुम्हाला माहिती आहे. सरकारकडे आता काही मागू नका, कुठलं सरकार आणायचं हे तुम्हीच ठरवा. किती पैसा साठवणार? मृत्यू अटळ आहे, मग कशासाठी एवढा संचय करायचा. कधी कळणार हे. पुढच्या पिढीसमोर काय आदर्श ठेवणार आहोत. रोज अन्न देणाऱ्यांची किंमत नसेल, तर आम्ही तरी किंमत का करावी? असा सवाल अभिनेते पाटेकर विचारतात.
माणसांपरीस मेंढरं बरी…!
मेंढरांना त्यांच्या एका नेत्याने सांगितले की, यंदा थंडीपासून रक्षण करण्यासाठी प्रत्येक मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल, ‘मोफत…’ मेंढरं लैच खुश झाली. आसमंतात बँबँबँबँ शिवाय दुसरा आवाजच ऐकायला मिळेना… इतक्यात एका कोकराने आईला हळूच विचारले की, हा नेता लोकरीच्या शालीसाठी लोकर कुठून मिळवेल? आणि मेंढरांच्या कळपात अचानक भयाण शांतता पसरली! राजकीय नेते सभेत कर्जमाफी, मोफत गहू, तांदूळ, अनुदान, मोफत एस.टी. प्रवास, विज अशा घोषणा करतात तेव्हा लोक खुश का होतात? ते विकत घ्यायला सरकार पैसे कुठून आणणार, हा प्रश्न माणसांना का पडत नाही? गेली सांगून ज्ञानेश्वरी… माणसांपरीस मेंढरं बरी…!