पुणे : ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरात लावलेल्या एका बॅनरची चर्चा जोरदार रंगली आहे. ‘जागृत पुणेकर’ नावाने लावलेल्या या बॅनरमध्ये ‘पाच वर्षे पक्ष सोडणार नाही,’ असे आश्वासन देणाऱ्या उमेदवारालाच आपले मत द्या, असे आवाहन करण्यात आले आहे. हे बॅनर्स कोणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मागील काही वर्षांत राज्यात बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या. अनेक पक्ष फुटले. उमेदवार निवडणुकीत मतदारांना दिलेली वचने विसरले. या पार्श्वभूमीवर पुण्यात लावलेले हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत.
जागृत पुणेकरांनो, उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना आपल्या परिचय पत्रात एकच उल्लेख करावा, की ‘मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणांशी आणि मतदारांशी ५ वर्षे प्रामाणिक राहीन. कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तीला निवडून देऊ नका,’ जो उमेदवार आपल्या परिचय पत्रात असे लिहिल त्यांनाच मतदान करा, असा मजकूर या बनर्सवर लिहिण्यात आला आहे.
दरम्यान, सजग नागरिक मंचाचे कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी प्रतिक्रिया दिली. या बॅनर्स कोणी लावले, हे आम्हाला माहिती नाही. मात्र, या बॅनर्समधील मजकुरांशी आम्ही सहमत आहोत. यावरून जनतेच्या मनात नेत्यांविरोधात नाराजी आहे, हे दिसून येते. लोकांना पक्ष आणि पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिक राहणारा उमेदवार हवा आहे. बॅनर्स लावताना लोकांनी त्यांचे नाव गुपीत ठेऊ नये. मात्र, लोकांच्या मनात भीती असल्याने नाव गुपीत ठेवल्याचे दिसत आहे. खरं तर हे योग्य नाही.