पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या गणेश मारणेचा शोध घेण्यासाठी आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांच्याकडे एकत्रित तपास करण्याकरिता त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची तपास अधिकारी यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर दोन्ही आरोपींना एक फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देत त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल शेलार (वय-३६), रामदास उर्फ वाघ्या मारणे (वय ३६, दोघेही रा. मुळाशी) यांची पोलीस कोठडीची मुदत बुधवारी २४ जानेवारीला संपल्याने दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे या दोघांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी मिटिंग घेतली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली होती.
मोहोळ खून प्रकरणाचे तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींची नऊ दिवस पोलीस कोठडी झाली आहे. परंतु, अद्यापही पोलीस खुनाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेत आहेत. त्यासाठी विविध भागात तपास पथके पाठविण्यात आली होती. तसेच एका ठिकाणाहून गाडी जप्त करण्यात आली आहे. यासाठी विठ्ठल शेलार व रामदास मारणे या दोघांची मदत झाली. मुख्य सूत्रधार सापडल्यानंतर अनेक गोष्टी समोर येऊ शकतील. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी शेलार आणि मारणे यांना चार दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आरोपीच्या बाजूने डी. एस. भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालच्या रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली.
युक्तिवाद करताना डी. एस. भोईटे म्हणाले, पोलिसांच्या तपासात नवीन काहीच मुद्दे नाहीत. त्यांच्याकडून प्रत्येक रिमांड रिपोर्टमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मागितली जात आहे. तसेच तपासात कोणतीही प्रगती दिसून येत नाही. यावर सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी आक्षेप घेत, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपी कुठे भेटले याचे स्थळ, सराव कुठे केला याची जागा पोलिसांनी शोधून काढली आहे. तसेच एक गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात प्रगती आहे, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने शेलार व मारणे यांना १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.