लोणी काळभोर : दहावीतील विद्यार्थ्यांच्या मेंदूतील पाण्याची गाठ फुटल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. मात्र लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले. आणि मुलावर तब्बल तीन तास यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले आहे. त्यामुळे विश्वराज हॉस्पिटलच्या डॉ. दर्शन गौड व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हर्षद तानाजी कुलाल (वय- 16, रा. होलेवाडी, बोरीऐंदी, ता. दौंड) असे जीवदान दिलेल्या मुलाचे नाव आहे. हर्षद कुलाल याला लहानपणापासून मेंदूमध्ये पाण्याची गाठ होती. मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नव्हता. मात्र त्याने 2024 मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर त्याला डोखेदुखीचा त्रास झाला. त्याचा त्रास खूपच वाढत गेला. त्यामुळे हर्षद कुलालच्या नातेवाईकांनी त्याला लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.
हर्षद कुलालला दवाखान्यात दाखल केले होते. तेव्हा त्याची प्रकृती खालावली होती व त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. मात्र विश्वराज हॉस्पिटलचे मेंदू व मणक्याचे तज्ञ डॉ. दर्शन गौड यांनी रुग्णाच्या तत्काळ चाचण्या केल्या. तेव्हा हर्षदच्या मेंदूमध्ये पाण्याची गाठ असल्याचे समोर आले. तसेच ती गाठ फुटली असून तिच्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे समोर आले. त्यामुळे हर्षद च्या मेंदूवर शस्त्रक्रिया त्वरित करण्याची गरज निर्माण झाली होती.
त्यानंतर डॉ. दर्शन गौड, डॉ. योगेश सातपुते व भूलतज्ञ डॉ. क्षितीज गायकवाड यांनी हर्षद कुलालला त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. त्याच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया तब्बल तीन तास चालली. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला दोन दिवस वेंटीलेटरवर ठेवण्यात आले. त्या त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेल्या. त्यानंतर हर्षद ची प्रकृती चांगली झाली.
दरम्यान, डॉ. दर्शन गौड व त्यांच्या सहकाऱ्यांनी याआगोदरही मेंदूवरील खूप शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. आतापर्यंत केलेल्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. 2023 ला एका 13 वर्षाच्या मुलीच्या मेंदूवरील कर्करोगाची गाठ काढून तिला जीवदान दिले आहे. तर अंत्यत धोकादायकरीत्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या अवघ्या 8 वर्षाच्या मुलीवरही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या तीनही मुलांची प्रकृती आता चांगली आहे.
हर्षदच्या आई-वडिलांनी मानले डॉक्टरांचे आभार
हर्षद च्या मेंदूवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर हर्षद ला दोन दिवस व्हेंटिलेटरवर होता. त्यामुळे आमच्या मनात खूप धाकधूक होती. मात्र त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेल्या. आणि डॉक्टर साहेब हर्षद आज तुमच्यामुळे ठणठणीत बरा झाला आहे. असे म्हणून हर्षद च्या आई-वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले.
लोणी काळभोर विश्वराज हॉस्पिटलचे मेंदू व मणका तज्ञ डॉ. दर्शन गौड म्हणाले, गेल्या पंधरा वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात असून रुग्णांना सेवा देण्याचे काम करीत आहे. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक पद्धतीने उपचार पद्धतीचा वापर केला जातो. त्याचबरोबर आलेल्या सर्व रुग्णांना चांगली सेवा दिली जाते. हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर असल्यामुळे रुग्णांवर त्वरित व योग्य वेळी उपचार होतात. हर्षद वरील अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.