पुणेः एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ हे दरवर्षीप्रमाणे यंदाही विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२४) या वर्षातील सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. यंदा या स्पर्धेचा ६ वा हंगाम २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सोमवार २९ जानेवारीला महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली तर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) प्रादेशिक संचालक पांडूरंग चाटे (आयआरएस), पद्मश्री पुरस्कारप्राप्त स्कायडायव्हर शितल महाजन, प्रा. डॉ.मंगेश कराड, डॉ.सुनीता कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
प्रा. डॉ.विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून व प्रा. डॉ.मंगेश कराड यांच्या पुढाकाराने राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी व त्यातून विविध क्रीडाप्रकारांत प्रतिभाशाली खेळाडू तयार व्हावेत, यासाठी विश्वनाथ स्पोर्ट मिट या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या क्रीडा व्यासपीठाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार करून राज्यासह देशाच्या क्रीडा संस्कृतीत भर घालण्याचा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
यंदाच्या स्पर्धेत क्रिकेट, फुटबाॅल, बॅडमिंटन, बास्केटबाॅल, हाॅलीबाॅल, कबड्डी, टेनिस, टेबल-टेनिस, खो-खो, वाॅटर पोलो स्विमिंग, बाॅक्सिंग, रोईंग, नेमबाजी इत्यादी खेळांमधून विद्यार्थ्यांना जवळपास 10 लाखांची बक्षिसे मिळविण्याची संधी आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या १२५ एकरांच्या प्रशस्त व विविध क्रीडा सुविधांनी सुसज्ज अशा कँपसमध्ये ‘खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ या ब्रिद वाक्यासह होणाऱ्या व्हीएसएम-६ मध्ये आत्तापर्यंत १३५ हून अधिक शैक्षणिक संस्थांमधील तब्बल ५ हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी आपली नावनोंदणी केलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पाच दिवस तब्बल १० हजार खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचा राबता विद्यापीठाच्या आवारात राहणार आहे. तसेच अद्यापही या स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरु असून राज्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊन विद्यापीठाच्या सुसज्ज क्रीडा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. मोहित दुबे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती अवार्डी प्रा.पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक व स्पर्धा नियोजन समितीचे चेअरमन डॉ.सुराज भोयार, तेजस कराड यांनी केले आहे.
यंदाच्या विश्वनाथ स्पोर्ट-६ मिटमध्ये १५ पेक्षा अधिक क्रीडा प्रकारांमध्ये १३५ शिक्षण संस्थांमधील ५ हजारांहून अधिक खेळाडू आपली प्रतिभा दाखविणार आहेत. विद्यापीठातील डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीमधील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी स्पर्धेच्या तयारीत आघाडी घेतली असून, त्यामुळे स्पर्धेच्या या चार दिवसांत विद्यापीठाचे वातवरण क्रीडामय होणार आहे.
– प्रा.डॉ. मंगेश कराड, कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.