पुणे : पुण्यातील व्हीआयपीस् ग्रुप – ग्लोबल ॲफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटेवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदरांची 125 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी खुटेवर कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ‘व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज’ची पुण्यातील 24 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई शुक्रवारी 4 एप्रिल रोजी केली.
मुंबई यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट, 2002 च्या तरतुदींनुसार ईडीने 24 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये 21 कोटी 27 लाखांची विविध बँकांमधील 58 खात्यांमधील शिल्लक रक्कम आणि 3 कोटी 14 लाख रुपयांच्या ठेवींचा समावेश आहे. यापूर्वी देखील तब्बल 62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यामध्ये मुख्य आरोपी विनोद खुटे याची 38.50 कोटींची मालमत्ता, विविध बँकांमधील 23 कोटींची रक्कम जप्त केली होती. व्हीआयपीईएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस कंपनीने लोकांची फसवणूक करुन लुबाडलेला पैसा हवाला आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात नेल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.
याबाबत ईडीचे असिस्टंट डायरेक्टर रत्नेशकुमार भुवनेश्वरलाल कर्ण (वय-43) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 9 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यावरून विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडधे व त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2020 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजजवळ असलेल्या निर्माण विवा सोसायटीमध्ये घडला होता. ईडीने जून महिन्यात पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये ‘व्हीआयपीएस ग्रुप’ आणि ‘ग्लोबल एफिलिएट बिझनेस’च्या केंद्रांवर छापा टाकला होता.
याबाबत अधिक महिती अशी कि, आरोपींनी संगनमत व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी व ग्लोबल अॅफिलेट बिजनेस या कंपनीच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना दर महिन्याला 2 ते 3 टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच आरोपींनी पॉन्जी स्कीम चालवून लोकांकडून कंपनीच्या बँक खात्यात पैसे न घेता इतर बँकेतील बोगस खात्यावर पैसे घेतले. तसेच कमीशन देण्याचे आमिष दाखवून स्किममध्ये इतर लोकांना पैसे गुंतवण्यास सांगून आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
लोकांना फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये चांगला परतावा देण्याच्या आमिषाने अनेक बनावट कंपन्या उभारून बोगस बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून काही दिवसांनी फॉरेक्स ट्रेडींग करायला लावले. यानंतर काना कॅपीटल ही कंपनी बंद केली. यामध्ये अनेक लोकांची 125 कोटी पेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याच तपासात निष्पन्न झालं.