पुणे : सासरच्या १२ जणांनी लॅबमध्ये घुसून जावयाला जबर मारहाण करत २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. एवढ्यावरच न थांबता जावयाला गाडीत डांबून पोलीस ठाण्यात आणल्याची घटना १८ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली होती. या प्रकरणी १६ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल शंकर घोणसे (वय ६०), सुनील शंकर घोणसे (वय ५८), माधव पाटील (वय ५५), भास्कर पाटील (वय ४५), काका हिवराळे (वय ४७), गोट्या उर्फ अश्विन पाटील (वय २४), एक महिला (सर्व रा. निवळी, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि इतर पाच अनोळखी लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महादेव ज्ञानोबा जाधव (वय ३५, रा. थेरगाव, पुणे. मूळ रा. उदगीर, ता. लातूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादी जाधव यांच्या लॅबमध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने एका कारमध्ये डांबून मारहाण करत वाकड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी फिर्यादी जाधव यांच्यावर त्यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात त्यांच्या सासरचे लोक सर्व आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यासाठी गेले. ते पोलीस ठाण्यात येत नसल्याने त्यांना बळजबरीने पोलीस ठाण्यात आणले गेले होते. जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने हा खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.