पुणे: हुंड्यासाठी विवाहित महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या भागात घडलेल्या घटनांमधून महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका घटनेत उच्चशिक्षित विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत हुंडा न दिल्याने विवाहितेला घराबाहेर हाकलून देण्यात आले.

सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
ही दुर्दैवी घटना सातवनगर, हांडेवाडी रोड येथे घडली. दिपिका प्रमोद जाधव (वय २९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दिपिकाच्या सासू द्वारका नामदेव जाधव (रा. सातवनगर) हिच्याविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपिका आणि प्रमोद यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दिपिका ही कृषी विषयात पदवीधर असून, खासगी क्षेत्रात नोकरी करत होती. तिचा पती एका शासकीय कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, लग्नानंतरपासूनच सासू तिच्यावर हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देत होती. दागिने व पैशांची मागणी सातत्याने केली जात होती. या त्रासाला कंटाळून २० जून रोजी दुपारी १२ वाजता, दिपिकाने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करत आहेत.
हुंडा न दिल्याने विवाहितेला घराबाहेर काढले
दुसऱ्या प्रकरणात भवानी पेठ परिसरात हुंड्याच्या कारणावरून विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देत घराबाहेर हाकलल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी ३२ वर्षीय महिलेनं खडक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचं २०१७ साली इलियास सय्यद (वय ३५) याच्याशी लग्न झालं होतं. मात्र, लग्नात हुंडा व दागिने न मिळाल्यामुळे पती, सासू-सासरे आणि ननंदाकडून तिला सतत त्रास दिला गेला.
तिच्यावर शारीरिक मारहाण, शिवीगाळ, मानसिक छळ करण्यात आला. पतीने डोक्याचे केस ओढले, चिमटे काढले, आणि तिचा गळा दाबत जिवे मारण्याची धमकी दिली. शेवटी तिला घरातून बाहेर हाकलून देण्यात आले. या प्रकरणी खडक पोलिसांनी पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार तुळसुळकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.







