पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चार दिवसांपूर्वी देशामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाली की आदर्श आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहते. आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक कामांवर आणि उपक्रमांवर बंदी घालण्यात येते. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाईलाही सामोरे जावे लागते. अशातच आता पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार केल्याचा आरोप काँग्रसने केला आहे.
या संदर्भात काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर तसेच मोहन जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये भाजपकडून जाणून बुजून शहरभर कमळ या चिन्हाचा वॉल पेंटिंग करत असल्याचे कलेक्टर यांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तसेच या संदर्भात जर भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार असा इशाराही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. आता यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.