पुणे : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय डॉ. विनायक मेटे यांच्या पुण्यातील फ्लॅटचा वाद चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील विमानतळ परिसरात मेटेंनी स्वत्तः च्या पैशांनी खरेदी केलेल्या फ्लॅट वरून कुटुंबात वादाची ठिणगी पडली आहे. विनायक मेटे यांच्या मुलाने विनायक मेटे यांची बहिण आणि तिच्या मुलाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फ्लॅटची मालकी आमच्या ताब्यात असून घराचे लॉक तोडून आत्या आणि तिच्या मुलाने अनधिकृतपणे ताबा घेतला आहे अशी तक्रार विनायक मेटे यांच्या मुलाने दिली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आत्या सत्वशीला महादेव जाधव आणि आकाश महादेव जाधव (रा. पंचगंगा सोसायटी, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशुतोष विनायक मेटे (वय २० रा. कोरेगाव पार्क पुणे) याने फिर्याद दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय डॉ विनायक मेटे यांच्या अपघाती निधनापूर्वी, त्यांनी पुण्यातील विमानतळ परिसरात गंगापूरम हाऊसिंग सोसायटी या इमारतीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, हा फ्लॅट त्यानी त्यांची बहीण सत्वशीला महादेव जाधव यांना भेट म्हणून दिला होता, अशी माहिती गुन्हा दाखल झालेला विनायक मेटे यांच्या बहिणीने आणि भाच्याने दिली आहे.
मात्र या फ्लॅटची सगळी कागदपत्रे हे विनाक मेटे यांच्या पत्नीच्या नावावर असताना आरोपी यांनी अनधिकृतपणे घराचे लॉक तोडून घराचा ताबा घेतला आहे, अशी तक्रार विनायक मेटे यांच्या मुलाने दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत.