अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : औद्योगिक वसाहतीतील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ (एमईपीएल) या कंपनीमुळे अण्णापूर, ढोकसांगवी निमगाव भोगी, आमदाबाद, शिरूर ग्रामपंचायत, शिरूर नगरपरिषद, कर्डेलवाडी, सरदवाडी या गावांना मोठ्या प्रमाणात केमिकल प्रदूषनाचा त्रास होत आहे. या पार्शवभूमीवर या गावातील नागरिकांनी कंपनी विरोधात एल्गार पुकारला आहे. ‘एमआयडीसी’ने दिलेले वाढीव क्षेत्र रद्द व्हावे, अशी मागणी देखील गावकऱ्यांनी यावेळी केली.
या कंपनी विरोधात अण्णापूर, ढोकसांगवी निमगाव भोगी, आमदाबाद, शिरूर ग्रा. शिरूर नगरपरिषद, कर्डेलवाडी सरदवाडी या गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांची अण्णापूर येथे संयुक्त बैठक झाली. या बैठकीला शिरूर पंचायत समिती माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे, पंचायत समिती सदस्य दादा पाटील घावटे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, शिरूर नगरपालिका नगरसेवक विठ्ठल पवार, अण्णापूर विद्यमान सरपंच दीपिकाताई शिंदे, उपसरपंच संतोष शिंदे, शिरूर ग्रामीण माजी सरपंच विठ्ठल घावटे, कर्डेलवाडी सरपंच, सरदवाडी सरपंच, उपसरपंच, निमगाव भोगी सरपंच उज्ज्वला इचके, उपसरपंच सांबारे, सरदवाडी सरपंच उपसरपंच व नागरीक उपस्थित होते.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड कंपनी गेल्या अनेक वर्षापासून या भागात चर्चेत आहे. या कंपनीमुळे या भागातील जवळपास सर्वच गावांच्या विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहे. तर जमिनीचा पोतही खराब झाला आहे. तसेच ओढे, नाले, बोरवेल्स यामध्ये कंपनीने नष्ट करण्यासाठी टाकलेली घातक केमिकल्स मिश्रित झाले आहे.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेले घातक केमिकल जमिनीत खड्डे घेऊन नष्ट करण्याचे काम कंपनी करीत आहे. त्यामुळे जमीनीच्या पाण्याच्या पातळीपर्यंत हे केमिकल जात असून या भागातील पाणी दूषित झाले आहे. ओढ्या नाल्यामध्ये आलेले पाणी फेसाळलेले दिसत आहे. तर या पाण्याचा उग्र वास परिसरात पसरत आहे. केमिकल युक्त पाण्यामुळे त्वचारोग, श्वसनाचे रोग व गंभीर आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच कॅन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कंपनीत काही वर्षांपूर्वी नष्ट करण्यासाठी घातक केमिकल आणले होते. या केमिकलच्या वासामुळे अनेक कामगार बेशुद्ध झाले होते. तर अनेक कामगार आजारी पडले होते. नागरिकांच्या जीवाशी खेळणारे केमिकल या ठिकाणी आणली जात आहेत. त्यामुळे भोपाळ सारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील या कंपनी विरोधात लोकसभेत आवाज उठवला आहे.
अशातच शासनाने या कंपनीला अधिकची जमीन देण्याचे ठरवले आहे, याला विरोध आणि ही कंपनी कायम स्वरूपी बंद करण्याकरिता अण्णपूर, निमगाव भोगी, आमदाबाद, शिरूर ग्रामपंचायत, शिरूर नगरपरिषद, कर्डेलवाडी सरदवाडी, या गावातील नागरिकांनी एल्गार पुकारला असून लवकरच मोठे आंदोलन या कंपनी विरोधात उभे राहणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.