राहुलकुमार अवचट
यवत : भांडगाव (ता. दौंड) येथील खोर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या वेस्टर्न मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत २८ मार्चला झालेल्या वायू गळतीमुळे खोर येथील एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले होते. कारंडे-पिंपळे वस्तीतील नागरिकांनी वेस्टर्न मेटल इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनी बंद करण्याची मागणी केली. तसेच उपोषणाचाही इशारा दिला आहे.
कंपनी बंद करण्याबाबतचे निवेदन स्थानिक ग्रामस्थांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिले असून, याबरोबरच पुणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, पुणे ग्रामीण पोलिस, आमदर राहुल कुल, तहसीलदार, भांडगाव ग्रामपंचायत प्रशासनाला देखील निवेदन देणार असल्याचे सांगितले.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, भांडगाव जवळ असलेल्या कारंडे-पिंगळे वस्तीजवळ खोर-भांडगाव रस्त्यावर १५ वर्षांपासून वेस्टर्न मेटल नावाची कंपनी असून, २८ मार्च रोजी झालेल्या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले आहेत. कंपनी परिसरात ३५ कुटुंबाची वस्ती असून लहान मुले, वयोवृद्ध वास्तव्यास आहेत.
कंपनीचे व्यवस्थापन अतिशय ढिसाळ असून कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही. कंपनी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे काळजी करत नसून, प्रदूषण व पर्यावरणाबाबत कोणतीही कायदेशीर पूर्तता कंपनीने केली नसून कंपनीला कोणाचाही धाक राहिलेला नाही.
कंपनीच्या कारभाराविषयी स्थानिक रहिवाशी गणेश लक्ष्मण गुलदगड यांनी वारंवार महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ व ग्रामपंचायत भांडगाव यांना पत्रव्यवहार करूनही कंपनीने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसून कारंडे-पिंगळे वस्ती येथील नागरिकांना कंपनीतून निघणारी काजळी व दुर्गंधीयुक्त वासाचा त्रास वर्षानुवर्ष होत असून, २८ मार्च झालेल्या अपघाती मृत्युमुळे कंपनीची सुरक्षितता पूर्णपणे समोर आली आहे.
वस्तीवरील अबालवृद्ध व रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, वेस्टर्न मेटल ही कंपनी ताबडतोब बंद करावी व वायु गळतीत झालेल्या युवकाच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापन व मालकाला कठोर शिक्षा करावी. अन्यथा अबालवृद्धांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
कंपनीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका
वेस्टर्न मेटल कंपनीबाबत ग्रामपंचायत भांडगाव व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळास तक्रार करून देखील कंपनीने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. या कंपनीमुळे आमच्या कारंडे वस्तीवरील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे .
– गणेश गुलदगड, स्थानिक नागरिक