पुणे : हवेली तालुक्यातील कोलवडी -साष्टे येथील रिकामे वस्ती परिसरात लावलेल्या दोन गावठी दारुभट्ट्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने उध्वस्त केल्या आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून ४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट ६ कडील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी व पथक हे गस्त घालत असताना कोलवडी -साष्टे येथील रिकामेवस्ती परिसरात नदीच्या कडेला एक जण दारुची भट्टी लावून दारु तयार करत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. तेथे ज्ञानेश्वर गब्बर रजपूत (वय २१, रा. वाडेगाव, ता. हवेली) हा भट्टी लावून दारु काढत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ७० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु, ८ हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच अशाच प्रकारे दुसऱ्या ठिकाणी हातभट्टीची दारु एक महिला देखील तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी अचानक पोलिसांनी छापा टाकला. तेथे ५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु, ४ हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.