जेजुरी (पुणे) : येथील जवळार्जून गावच्या नदी पात्रात बेकायदेशीररित्या गावठी दारुची हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. यावेळी या कारवाईत सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचे दारु तयार करण्यासाठीचे साहित्य नष्ट करण्यात आले, अशी माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळार्जून गावच्या हद्दीत सालोबा मळ्यात नदीच्या पात्रात झाडा-झुडपांनी वेढलेले ठिकाण आहे. त्याठिकाणी बेकायदेशीररित्या गावठी दारु तयार करण्याची भट्टी उभारली होती. याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी या दारुभट्टीवर छापा टाकला.
यावेळी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य अंदाजे 2 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दोन लोखंडी पातेले, 13 हजार लिटर कच्चे रसायन, 525 लिटर तयार दारू, प्लास्टिक कांड आदी जप्त करण्यात आले आहे. यावेळी जेसीबीच्या साह्याने सर्व साहित्य नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित नशीब कचू राठोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यात जेजुरी पोलिसांनी धडक कारवाई करून अनेक दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. तसेच अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाई बद्दल जेजुरी व परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.