पुणे: पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे वगळली असून, या दोन गावांसाठी स्वतंत्र ‘ब’ वर्ग नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्याने नागरिकांमध्ये ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण आहे. नगरपालिकेचा अध्यादेशही जारी केला आहे. नगर परिषदेचा कारभार पाहण्यासाठी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांची राज्य सरकारतर्फे प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
नगर परिषदचे नवीन प्रशासक राजपूत यांनी फुरसुंगी येथील कार्यालयात कारभार सुरू केला आहे. गावाची संपूर्ण माहिती नागरिकांकडून समजावून घेतली व अडीअडचणीसंदर्भात चर्चा केली. दोन्ही गावांची संपूर्ण माहिती प्रशासक घेणार आहेत. अधिकृतपणे प्रशासक म्हणून तहसीलदार विक्रम राजपूत यांनी कार्यभार स्वीकारल्यामुळे आता फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेचा कारभार सुरू झाला आहे. परंतु, नगर परिषदेचा टॅक्स कसा असणार, कर्मचारी कसे उपलब्ध होणार, अशा अनेक शंका नागरिक व्यक्त करत आहेत.