बापू मुळीक / सासवड : सातारा जिल्ह्यातील पेरले गावच्या आपण बाहेरवाशिन पुरंदर तालुक्यातील परिंचे गावच्या सासुरवाशीन झाल्या. पती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असताना चार आपत्य सासू-सासरे असे आठ जणांचे कुटुंब गावाकडे एकत्र नांदत असताना दृष्ट लागावी अशी सन 1993 ला पती निधनाची घटना घडली. आणि आपल्या संघर्ष यात्रेला प्रारंभ झाला.
अनुकंपा तत्वावर बँकेत नोकरी लागली. अवघे दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या विजया जाधव दहा वर्षाखालील चार मुलासह सात जणांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी गरजेच्या ठरल्या. न डगमगता कष्टाची तयारी ठेवत ती स्वीकारली नव्हे, तर गावच्या साडेतीन एकर शेतीच्या मदतीने संसार गाडा सुरळीत सुरू ठेवला. परिंचे, पद्मावती, धनकवडी, मार्केट यार्ड, मंडई, दापोडी व कात्रज अशा विविध शाखेतून आपण कार्यरत राहिला. याच काळात बँकेची गरज म्हणून काहीशी धावपळ करत ओढाताण करून आपण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून वाणिज्य शाखेच्या पदवीधर झाला.
एवढंच नव्हे तर एम. एस. सी. आय. टी हा संगणकीय कोर्स देखील पूर्ण केला. नोकरी मुलांचे शिक्षण कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आपण मुलांच्या शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष देऊन दिवेश, विवेक, रूपाली आणि दिपाली या चारही मुलांना उच्चशिक्षित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. घरी आलेल्या दोन्ही सुना पुनम एमबीए व मयुरी एमकॉम पदविका प्राप्त असून, एकूणच आपण सर्वांच्या शिक्षणावर विशेष भर दिला.
पुणे व परिंचे येथे स्व मालकीची घरे व गावाकडील शेती जतन करून आपण कुटुंब उभारणीत यशस्वी झाला. आपल्या कार्यकर्तुत्वाचा गौरव करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या स्वर्गवासी एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नारी शक्तीचा सन्मान म्हणून “तू ही दुर्गा” सन्मान करण्यात येत आहे.