पुणे : अजितदादांच्या प्रेशरमुळे माझी किडनी फेल झाली. ह्रदय बंद पडलं, त्यांच्यामुळे मला डायलीसिस करावं लागलं, त्यामुळे मला वेगवेगळे शारीरिक आजार झाले, असा दावा विजय शिवतारे यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कौटुंबिक त्रासामुळे विजय शिवतारेंची किडनी फेल झाली, उगाच अजितदादांवर खापर फोडू नका, नाहीतर फजिती ऐका अशी परिस्थिती होईल.
उमेश पाटील यांनी म्हटले की, ‘शिवसेनेचे नेते शिवतारे यांनी वक्तव्य केलं की, अजितदादांच्या प्रेशरमुळे मला किडनीचा आजार झाला, किडनी फेल झाली. ह्रदय बंद पडलं, त्याच्यामुळे मला डायलीसिस करावं लागलं, त्यामुळे मला वेगवेगळे शारीरिक आजार झाले. गुंजवली धरणासाठी उपोषणाला बसल्यामुळे मला सगळे आजार झाले. मात्र, शिवतारे धादांत खोटं बोलत आहेत. त्यांना जे काही त्रास झालेले आहेत, ते कौटुंबिक भांडणातून झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आलेला पाहिलेला आहे. त्याच्यातून जो ताण आला, जे प्रेशर आलं, त्यातून हे सर्व आजार शिवतारेंना झाले आहेत.’ कुणाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायला नको, पण त्यामध्ये आम्हाला डोकावायचं नाही. नाहीतर फजिती ऐका अशी तुमची परिस्थिती होईल. दोन्ही मुले सोबत राहत नाहीत, दोन्ही मुलं सोबत का राहत नाहीत, याचा त्यांना विचार करावा. त्यांच्या कुटुंबातील वादामुळे त्यांना हे आजार झालेले आहेत, असे सांगत पाटील यांनी शिवतारेंवर निशाणा साधला.
शिवतारेंनी पुरंदर तालुक्यासाठी काय केले, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. गेली १० वर्षे शिवतारे आमदार होते. त्यातील दुसऱ्या टर्मला मंत्रीदेखील होते, सिंचन मंत्री होते. या गुंजवली धरण शिवतारेंनी बांधलं का, त्यांचं काय योगदान आहे, गुंजवली धरणासाठी त्यांचं काय योगदान आहे, धरण बांधलं कुणी, असे अनेक प्रश्न उमेश पाटील यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. पुढे ते म्हणाले की , शिवतारे फक्त सांडव्यासाठी उपोषणाला बसले, म्हणजे सर्व काम झाल्यानंतर ०.१ टक्के कामासाठी त्यांनी उपोषणाला बसण्याचे नाटक केले, असे म्हणत पाटलांनी शिवतारेंना लक्ष केले.
अजितदादांनी जेजुरीला अ दर्जा दिला, शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला, मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण केल्या, पालखी मार्ग कुणी केला, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ कुणी केलं, हे सर्व अजित दादांनी केलं. पालखी मार्ग झाल्यामुळे पुरंदर तालुक्याचं आर्थिक विश्व बदललं. पुरंदर तालुक्याची पुणे, सातारा तालुक्यासोबत कनेक्टिव्हिटी वाढली, त्यामुळे पुरंदर तालुक्याचं अर्थकारण वाढलं, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. अजित पवार आणि शरद पवारांचं नाव घ्याययं आणि प्रसिद्धीझोतात यायचं एवढंच शिवतारेंनी केलं आहे. एकीकडे मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची भाषा करता आणि दुसरीकडे एका-एका महत्त्वाच्या खासदाराच्या पाठी उभं राहण्याऐवजी त्यांच्या विरोध करता, अशी दुहेरी भूमिका शिवतारेंना घेता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंचे चांगले कान उपटले पाहिजेत, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.