-बापू मुळीक
सासवड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर आज बुधवारी (दि.04) जलसंपदा विभागाने मूळ आराखड्यानुसार गुंजवणी जलवाहिनीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले.
सकाळी परिंचे गावाच्या वाड्या वस्त्यांपासून सुरु झालेले हे सर्वेक्षण माहूर, हरणी, वाल्हे व वाल्हे गावच्या सर्व वाड्या वस्त्या करीत राख पर्यंत गेले. 24 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेसह त्यांच्या मागणीनुसार सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, उपसचिव व कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक आदींची गुंजवणीबाबत बैठक घेतली होती. त्यात मूळ सर्वेक्षणानुसार माहूर, परिंचे, हरणी, वाल्हे व राख या गावांच्या उत्तर दिशेने जलवाहिनी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी स्वतः माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागासह लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत रानोमाळ फिरून जलवाहिनीची दिशा दर्शवली.
यावेळी कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडूलकर, उपअभियंता नयन गिरमे, शाखा अभियंता गणेश टोलमारे, लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीचे रामराजू पुसापती, प्रसाद बारस्कर हे अधिकारी उपस्थित होते. स्थानिक गावांमधील दिलीप आबा यादव, शालिनीताई पवार, फत्तेसिंग पवार, बाजार समिती सभापती शरद जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उल्हास जाधव, समीर जाधव, काका राउत, सागर करवंदे, अर्चना राऊत, सुशीलकुमार जाधव, बाळासाहेब मुळीक, हरणी येथील सरपंच धनंजय यादव, नितीन यादव, सागर भुजबळ, बाळासाहेब राऊत, महेंद्र पवार, उषा पवार, राहुल यादव, भाऊसाहेब भोसले, हरिभाऊ पवार, अमित पवार, मदन भुजबळ, कांतीलाल भुजबळ, सुहास खवले, प्रशांत पवार, रोहित भोसले, रत्नाकर रणनवरे, मनोज रणनवरे, राहुल रणनवरे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी शिवतारे म्हणाले, मी राज्यमंत्री असताना निविदा प्रक्रिया होईपर्यंत आराखड्यात कुठलाही बदल नव्हता. पण पुढे जुलै 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान आमदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जलवाहिनीत बदल केला. बारामती अॅग्रोच्या जमिनीला पाणी नेण्यासाठी जलवाहिनीची दिशा बदलण्यात आल्याचा आरोपही शिवतारे यांनी केला. हा प्रश्न सोडवण्यासाठी पाच वर्ष आमदारांनी काहीच केले नाही. शेतकऱ्यांनी उठाव केल्यावर आणि निवडणुका आल्यावर आमदारांना शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे.
या मार्गे होणार जलवाहिनी
माहूर, परिंचे व वाड्या वस्त्या, हरणी, बापसाईवस्ती, हनुमान वस्ती, आडाचीवाडी, वागदरवाडी, बहिर्जीचीवाडी, मोरुजीचीवाडी, बाळाजीवाडी, वडाचीवाडी, पवारवाडी, झापवस्ती, अंबाजीवाडी, गायकवाडवाडी, मुकादमवाडी, सुकलवाडी, कामठवाडी या मार्गे जलवाहिनी होणार आहे.