पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्यावेळी माझ्या प्रचाराला अजितदादाच येणार असल्याचे सांगत विजय शिवतरे यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे जिंकून येणार नाहीत, असेही ते म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना खुली धमकी दिली होती. तू निवडून कसा येतो, तेच बघतो.अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी ठरवलं तर एखाद्याला आमदार होऊच देत नाही, असं वक्तव्य अजित पवारांनी शिवतारेंना उद्देशून केले होते. त्याप्रमाणे विजय शिवतारेंना पराभवालाही सामोरं जावे लागले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले होते.
परंतु गेल्यावर्षी जुलै महिन्यात अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर पुढे जाऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील झाले. या दरम्यान शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे या दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्या प्रकारे संवाददेखील पाहण्यास मिळाला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटल्याचे दिसून आले. या दरम्यान रविवारी पुणे जिल्ह्याचा महायुतीचा मेळावा झाला. त्या मेळाव्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
अजित पवार हे महायुतीबरोबर आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत तुमची अडचण होणार का ? या प्रश्नावर विजय शिवतारे म्हणाले की, महायुतीमध्ये अनेक नेते आणि पक्ष सहभागी होत आहेत. राज्याचा विकास होण्याच्या दृष्टीने महायुतीमध्ये सहभागी झालो, असे विधान अजित पवार यांनी यापूर्वीच केले आहे. त्याप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीबाबत सांगायचे झाल्यास, आता माझी काहीच अडचण होणार नसून माझ्या प्रचाराला अजितदादाच येणार असल्याचे सांगत विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत 45 जागा महायुती जिंकणार असे नेते मंडळींकडून सांगितले जात आहे. पण सर्व पक्षांनी प्रामाणिकपणे काम केल्यास सर्व 48 जागा जिंकू आणि कोणीच काय एकट्या सुप्रिया सुळेदेखील जिंकणार नसल्याचे विजय शिवतारे म्हणाले.