यवत : बारामती लोकसभा म्हणजे कुणाचा सातबारा नाही. गेली ४० वर्षे पवारांना मतदान केले. यावेळी मला मतदान करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यवत येथे केले. आज दौंड तालुक्यातील विविध गावांचा गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे शिवसैनिकांनी व यवतकरांनी विजय शिवतारे यांचे स्वागत केले.
शिवसेना नेते श्रीपती दोरगे यांनी प्रास्ताविक केले तर शेतकरी संघटनेचे खंडू दोरगे यांनी यवत परिसरातून नक्कीच आघाडी मिळेल, असे सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर जनतेकडून जागोजागी स्वागत करण्यात येत असून, बारामती लोकसभा मतदारसंघ कुणाचा सातबारा नाही, ४० वर्षे निवडून दिले. परंतु बारामती शहर वगळता मतदारसंघात कोठेही विकास झालेला दिसत नाही.
यावेळी ननंद-भावजय या पवार कुटुंबियातच होणारी निवडणूक यामुळे गेली ४० वर्षे विरोधात पडणारी सुमारे ५ लाख ८० हजार मतदारांना त्यांच्या आवडीचा उमेदवार मिळावा या उद्देशाने मी ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले, असे विजय शिवतरे यांनी सांगितले.
मतदार हा राजा असून, ४० वर्षे मतदान करून काय केले? विकास फक्त बारामती शहराचा झाला. लोकसभेची निवडणूक समोर असून, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हेच चाललंय ना. अरे बारामती हा देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे. सतत बारामतीचा खासदार पाहिजे. पुरंदर, इंदापूर, दौंड, भोरचा का नको? का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं? परंतु इतर तालुक्यांना काय मिळालं? असा प्रश्न देखील उपस्थित केला.
दौंड तालुक्यातील जनतेने कायमच विरोधी पक्षाला आघाडी दिली असून, दौंड तालुक्याचा व या भागाचा विकासासाठी यावेळी माझा विचार करून इतिहास घडवा. यासाठी एकदा मला मतदान करा, असे आवाहन देखील केले असून, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा होऊन देखील आज बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरण्यासंदर्भात घोषणा केलेले विजय शिवतारे यांनी आज दौंड तालुक्यातील यवत, चौफुला, वरवंड, केडगाव, पारगाव या महत्त्वाच्या गावांच्या मतदारांशी संवाद साधला.
यावेळी शिवसेना पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप यादव, युवा नेते गणेश यादव, गणेश वाघमारे यांसह यवत परिसरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची ठाण्यात जाऊन भेट तरीही बॅनरबाजी
बारामती लोकसभा निवडणुकीवरून शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यात जाऊन भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी दोन दिवसांनंतर पुन्हा चर्चा करू, तोपर्यंत शांत राहण्याच्या सूचना केल्याची माहिती त्यांनीच दिली होती. असे असूनही अजित पवारांच्या सभेच्या मुहूर्तावरच बापूंनी केलेली बॅनरबाजी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे.