मुंबई : पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. तसेच अजित पवार यांच्या नावाने गेले काही दिवस बोंबाबोंब करुन बारामती लोकसभा मतदारसंघातील काही गावात जावून नागरिकांच्या भेटी गाठी देखील घेण्यास सुरुवात केली होती.
मात्र, आता त्याच बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी विजय शिवतारेंची कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. शिवतारेंच्या पुरंदरमध्ये आज महायुतीची समन्वय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासाठी शिवतारेंचे कार्यकर्ते या बैठकीला हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला माजी मंत्री आणि अजित पवारांचे विरोधक राहिलेले विजय शिवतारे उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांचे कार्यकर्ते या समन्वय बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती आहे. विजय शिवतरे हे मुंबईत असल्याने आजच्या बैठकीला उपस्थित नसणार, मात्र त्यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा आजच शुभारंभ झाल्याचे यावरुन दिसून येते.
बंडानंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी माझी चर्चा झाली, यानंतर मी लढणार नाही असा निर्णय घेतला. त्याआधी आमचे नेते खतगावकर यांचा मला फोन आला होता. त्यांनी समजावले की, तुमच्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत येतील. अशा प्रकारे सर्वत्र अपक्ष उभे राहीले तर १० ते २० खासदार पडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ्या विजयाने पुन्हा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपण न लढण्य़ाचा निर्णय घेतल्याचे विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.