पुणे : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक यंदा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार असल्याचं चित्र दिसत आहे. आपण वेळ पडल्यास कोणत्याही मार्गाचा अवलंब करून बारामतीमधून भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू, असं वक्तव्य विजय शिवतारे यांनी केलं आहे. शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी विजय शिवतारे बोलत होते.
बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणारच
विजय शिवतारे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे. त्यामुळे मला पवार घराण्याविरोधातील मतं मिळतील. माझ्यावर शिवसेना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी मी बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणारच, असं विजय शिवतारे म्हणाले.
सुनेत्रा पवार पराभूत होणार
मी शंभुराज देसाई यांना माझी भूमिका सांगितली आहे. ते माझं म्हणणं मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर घालणार आहेत. मी एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट सांगितली होती. पण त्यांनी म्हटले की, महायुतीत बारामतीची जागा अजित पवार गटाला सुटली आहे. पण सुनेत्रा पवार पराभूत होणार आहेत. त्यामुळे महायुतीचे नुकसान करण्याऐवजी ही जागा शिवसेनेला द्यावी. मी धनुष्यबाणाच्या चिन्हावर बारामती लोकसभेची निवडणूक जिंकून दाखवेन, असा दावा विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर केला होता.
मी खूप पुढे गेलोय, आता माघार नाही
जनता म्हणते की बापू तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे मी आता खूप पुढे गेलो आहे. आता माघार घेऊ शकत नाही. अनेक नेते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझ्यावरती बारामतीतल्या जनतेचा दबाव आहे आणि त्यामुळे आता माघार घेणं शक्य नाही. 2019 चा बदला म्हणून नाही तर बारामतीतल्या जनतेला असं वाटतं की पवारांव्यतिरिक्त आता पर्याय हवा. म्हणून मी निवडणूक लढणारच आहे, असा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे.