पुणे : बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता मी ही निवडणूक लढणारच, माघार घेणार नाही असा पक्का निर्धार शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन विजय शिवतारे भेटीगाठी घेत आहेत. एक अर्थाने ते प्रचार करत आहेत. पुण्यातील कात्रज, आंबेगाव, नऱ्हे हा सगळा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. या परिसरात विजय शिवतारे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला.
शिवतारे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना ना सुप्रिया सुळे यांना मत द्यायचंय, ना अजित पवारांना मत द्यायचंय, मग हे मतदार जाणार कुठे असा सवाल उपस्थित करत विजय शिवतारे म्हणाले माझी पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी अजित पवार गटातील लोकांकडून होत आहे.
ते पुढे म्हणाले की, अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांनी याचा विचार करावा, अनेक जण इच्छुक आहेत. हर्षवर्धन पाटलांचं मला माहित नाही, पण मी माघार घेणार नाही.
दरम्यान, विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार असा वाद उफाळून येताना दिसत आहे. बारामतीमध्ये महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित असलं तरी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम आहेत. सासवड येथील पालखीतळ मैदान या ठिकाणी विजय शिवतारे 1 तारखेला जाहीर सभा घेणार आहेत. आता या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.