पुणे : लोकसभा निवडणुकीच्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांनी सुनेत्रा पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला अजितदादा यांनी तिकीट दिले, याबाबत मला आश्चर्य वाटते. याबरोबरच पुरंदर हवेली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर संभाजी झेंडे यांना उमेदवारी देण्यात आली. संभाजी झेंडे यांनी सुनेत्रा पवार यांना पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यांना उमेदवारी दिली ही दिवाळखोरी आहे, असे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र केली.
माजी जिल्हाधिकारी असलेले संभाजी झेंडे यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. संभाजी झेंडे यांनी अर्ज भरताच विजय शिवतारे यांनी अजितदादा पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांनी माघार घेतली होती. माघार घेऊन सुनेत्रा पवार यांना मदत करणारे विजय शिवतारे यांच्याविरोधात अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी झेंडे हे पुरंदर विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांच्यासमोर उभे राहिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मदत करुनही अजित पवार यांनी पुरंदरमधून विजय शिवतारे यांच्याविरोधात उमेदवार कसा दिला, असा प्रश्न उद्भवला होता. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना शिवतारे म्हणाले, जेव्हा मी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली होती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, पुरंदरचा किल्लेदार हा विधानसभेमध्ये पाठवा. तरीसुद्धा संभाजी झेंडे यांची उमेदवारी का जाहीर करण्यात आली? निष्ठावान राष्ट्रवादीच्या नेत्याला संधी दिली असती तरी मला चालले असते. परंतु ज्यांनी सुनेत्रा पवार यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला होता, त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला आहे? असा प्रश्नही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे.