पुणे : पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुणे शहरातील असे वाहतुक कोंडीचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले असतीलच. अशातच आता पुण्यातील वाहतुक कोंडीचा सामना खासदार सुप्रिया सुळे यांनाही करावा लागलेला दिसून येत आहे. शहरातील या वाहतूक कोंडीत खासदार सुप्रिया सुळे या तब्बल एक ते दीड तास अडकून होत्या, मात्र यावेळी त्यांनी चक्क दुचाकीने प्रवास केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दुचाकीवरुन केलेल्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे..
व्हिडिओमध्ये बोलताना काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?
व्हिडिओच्या सुरवातीला बोलताना त्या म्हणाल्या की, नमस्कार, मी गेले दीड तास पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. शेवटी यांची मदत घेतली आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीची मदत मागितली, त्यांचे नाव विचारत आहे. त्यानंतर यांची मदत घेऊन मी माझ्या पुढच्या मिंटिगला जात आहे. शिवाय त्या बाईक चालवणा-या व्यक्तीला धन्यवाद करतात. मग व्हिडिओची दुसरी बाजू चालू करुन रस्त्यावर असलेले ट्रॅफिक दाखवत आहेत. तसेच आजुबाजूचे प्रवासीही त्यांच्याशी बोलत असलेले व्हिडिओमध्ये दिसत आहे.
यावेळी खासदार सुळे यांनी व्हिडिओच्या शेवटी म्हणाल्या की, माझी प्रशासनाला विनंती आहे. पुण्यातील ट्रॅफिकच काही तरी करा. सर्वच नागरिक तासनतास या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. प्लिज करुन काही तरी मार्ग काढा. तसेच ट्रॅफिकमध्ये असलेले काही नागरिक सुप्रिया सुळेंना पाहून नमस्कार करत असताना दिसत आहे.