पुणे : ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांचे वय 95 होते. त्यांच्या निधनाने शास्त्र आणि संस्कृती क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आज सकाळी 11 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या मागे मुलगा श्रीवर्धन गाडगीळ, सून आणि नातू असा परिवार आहे. पंडित गाडगीळ यांचे योगदान आणि त्यांचा बौद्धिक वारसा येणा-या पिढ्यांना प्रेरणा देऊन जाणारा आहे, असा विश्वास संस्कृत विद्वानांनी व्यक्त केला आहे.
पंडित वसंतराव गाडगीळ हे संस्कृत साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक वर्षे संस्कृत भाषेच्या अभ्यासात व्रतस्थपणे कार्य केले होते. पंडित गाडगीळ यांनी प्रत्येक वर्षी पुण्यात ऋषीपंचमीनिमित्त 80 वर्षावरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रात सातत्याने विधायक कार्य करणा-या पुण्यातील आणि पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार ते घडवून आणत.