पुणे : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा देणारा विद्यार्थी जर परीक्षा कक्षात उशिरा आला तर त्याला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट सांगितले आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाचल्यानंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द, पुढील परीक्षेसाठी प्रतिबंधित, पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. असेही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
दरम्यान, करोना प्रादुर्भावामुळे गतवर्षी राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. त्यात शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी पंधरा मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ आदींचा समावेश होता. मात्र यंदा नियमित पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यामुळे या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत.
याबाबत बोलताना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक म्हणाल्या कि, राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षे संदर्भातील विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. तसेच या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.