मुंबई: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे आता राजगड म्हणून नामांतर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून बुधवारी घेण्यात आला.
वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव घेण्यात आले होते. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत देखील ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता. त्यानंतर आज अखेर वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे.
अजित पवारांचा सतत पाठपुरावा…
राज्याचे विरोधी पक्षनेते असताना 27 एप्रिल 2023 ला अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यासाठी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी केलेली मागणी आज त्यांच्याच उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे.