पुणे : तक्रार दिल्याच्या रागातून १५ जणांच्या टोळक्याने वैदूवाडी येथे फिर्यादीच्या घरावर हल्ला करून परिसरातील वाहनांची व दुकानांची तोडफोड केली. तसेच हातातील शस्त्राने वार करुन परिसरात दहशत पसरवणाऱ्या सुरज उर्फ चुस बाळु मोहिते व त्याच्या इतर १५ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत १०९ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. याप्रकरणी टोळी प्रमुख सुरज उर्फ चुस बाळु मोहिते (वय-२१, रा. वैदवाडी, हडपसर), अनिकेत रविंद्र पाटोळे (वय-२३), आदीत्य रविंद्र पाटोळे (वय-२०), नवनाथ उर्फ लखन बाळू मोहिते (वय-१९), तुषार बाळू मोहिते (वय-१८), हसनेल अली शेनागो (वय-१९), गौरव विजय झाटे (वय-१९), पंकज विठ्ठल कांबळे (वय-२१), ओमकार महादेव देढे (वय-१९), रविंद्र बाबुराव पाटोळे (वय-४६), सचिन मारुती खंडाळे (वय २५, सर्व रा. वैदुवाडी, रामटेकडी हडपसर) यांच्यासह पाच अल्पवयीन मुलांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून, ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर टोळी प्रमुख सुरज मोहिते व सचिन खंडाळे हे फरार आहेत.
हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
या घटनेचा पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.