लोणी काळभोर, (पुणे) : दोन आठवड्यांपासून आठवडे बाजारात पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे दर वाढलेले आहेत. सध्या कडक ऊन आहे. कडक उन्हामुळे भाज्यांचे उत्पादन कमी होत असून, आवकही कमी झाली आहे. परिणामी, सर्वच भाज्या महागल्या आहेत. मागील पंधरा दिवसांपासून हवामानात सारखे चढ-उतार होत असून, त्याचा परिणाम पालेभाज्यांच्या उत्पन्नावरही झाला आहे.
दोन आठवड्यांपासून आठवडे बाजारात पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे दर वाढलेले आहेत. यात वांगे 60 ते 80 रुपये किलोने विक्री होत आहेत. त्यापाठोपाठ आता टोमॅटो 40, कांदे 25 ते 30 रुपये किलोच्या घरात गेले आहेत. मेथी, पालकही 25 ते 30 रुपये जुडीने विक्री होत आहे.
अल्प पाऊस पडल्यामुळे व वातावरण बदलामुळे सध्या पालेभाज्या कडाडल्या आहेत. लसूण पुन्हा एकदा 220 ते 250 रुपये किलो झाला आहे. राज्याच्या विविध भागांत होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला पिकावर होत आहे, तसेच वातावरण स्वच्छ न राहिल्यामुळे भाजीपाला पिकांवर किडीचा प्रादूर्भाव जाणवत आहे. परिणामी, भेंडी, काकडी, टोमॅटो, कोबी यांसह आदी फळभाज्या महागल्या आहेत.
दरम्यान, भाजीपालाही चांगलाच तेजीत आला असून त्याचा फारसा लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याचे चित्र लोणी काळभोर येथील बाजारातील आहे. साधारणतः भाजीपाल्यास 80 ते 100 रुपये प्रतिकिलोचे भाव किरकोळ बाजारात आहेत.
भाजीचे नाव व कंसात बाजारभाव किलोमध्ये
वांगी – (40 ते 60), लसूण (220 ते 250), बटाटे (40), कांदे (25), काकडी (50), टोमॅटो (30), मिरची (60 ते 80), पत्ता कोबी (40), पालक (1 जुडी 15), भेंडी (60 ते 80) रुपये किलो.
सध्या शहरातील भाजीमंडईत जवळपास सर्वच भाज्या महाग झाल्या आहेत. वांगी, पत्ताकोबी, बटाटे आदी भाज्या तुलनेने स्वस्त असल्या तरी गवार, फ्लॉवर, पालक, कोथिंबीर या भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. या भाववाढीमुळे गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले हे नक्की आहे. उन्हाळ्यात पालेभाज्यांची स्थानिक आवक मंदावते तेव्हा बाहेरची आवक सुरू होते. यामध्ये कोथिंबिरीची आवक अधिक असते. भर उन्हात कोंथिबीर उत्पादन घेणे कठीण असताना बाजारात मात्र आवक दिसत आहे. अशावेळी ही कोथिंबीर विदेशी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. देशी उत्पादन कमी झाल्याने शेतकरी विदेशीवर भर देतात.
अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका
सध्या राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांकडे शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने जिल्ह्यात फळभाज्यांची लागवड कमी आहे. सध्या शहरात सोलापूर, दौंड, पुरंदर, लातूर परिसरातून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.
यावेळी कदमवाकवस्ती येथील पल्लवी कदम म्हणाल्या, मागील महिन्यात 200 रुपयात पूर्ण आठ दिवसांचा भाजीपाला मिळत होता. भाज्यांचे दर पन्नास रुपयांपेक्षा अधिक आहेत. सर्वच पालेभाज्या व फळभाज्यांचे दर पन्नाशीच्या पुढे आहेत. ग्राहकांच्या उत्पन्नांपेक्षा खर्चात दिवसेंदिवस वाढत आहे. स्वयंपाक घरातील वस्तूंच्या किमती वाढल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. दरावर नियंत्रण नसल्याने सातत्याने वाढ होत आहे.
याबरोबरच लोणी स्टेशन येथील भाजी विक्रेत्या पंचफुला खोसे म्हणाल्या, ”उन्हाची तीव्रता वाढल्याने आवक कमी झाली आहे. यामुळे सर्वच भाजीपाल्यांचे दर तेजीत आहेत. कडक उन्हामुळे भाज्या लवकर कोमजत आहेत. त्यांच्यावर सतत पाण्याचा फवारा मारावा लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरही महिनाभर भाजीपाला स्वस्त होणार नाही.”