अमोल दरेकर
सणसवाडी : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात वसेवाडी शाळेने विविध खेळांमध्ये दणदणीत विजय मिळवला. ही स्पर्धा वाडा पुनर्वसन येथे पार पडली.
या क्रीडा स्पर्धांमध्ये शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा केंद्रातील शाळांनी सहभाग घेतला होता. कबड्डी मोठा गट मुली आणि मुले गटामध्ये वसेवाडी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. खो-खो खेळात मुलींनी द्वितीय क्रमांक, लांब उडी खेळात मुलांच्या गटात साईराज लोहार तर मुलींच्या गटात आरती नागणसुर हिने प्रथम क्रमांक पटकावला. थाळी फेक खेळातील मोठ्या गटात मुलांच्या गटात निखिल पटेवर तर मुलींच्या गटात प्रेरणा गांगर्डे हिने प्रथम क्रमांक पटकावला. गोळा फेक स्पर्धेत मुलांच्य गटात मोनू गुडदावत याने प्रथम क्रमांक तर मुलींच्या गटात रीना साहू हिने द्वितीय क्रमांक पटकावला. धावण्याच्या स्पर्धेत रीना साहू हिने प्रथम क्रमांक मिळवत निर्विवाद वर्चस्व राखले. सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोठ्या गटात ईश्वरी अमोल दरेकर हिने तर लहान गटात प्रशांत कश्यप याने प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले.
मुख्याध्यापक संतोष गोसावी यांच्यासह सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यापूर्वी स्कुल ऑलम्पिक खेळात सहभागी झाल्याचा लाभ विद्यार्थ्यांना झाला. सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल हरगुडे, उपाध्यक्ष अमोल दरेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, समिती सदस्य यांनी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.