पुणे : शर्मिला ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमात दिसत आहेत. यातून त्या सातत्याने राजकीय वक्तव्य करत आहेत. पुणे इथल्या कोंढव्यात झालेल्या कार्यक्रमात साईनाथ बाबर दिल्लीत गेला तर, दुधात साखर पडेल असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यावर काही तासांमध्येच वसंत मोरेंनी व्हाट्सॲप स्टेट्स ठेवत राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
“कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार.” असे, व्हाट्सॲप स्टेट्स वसंत मोरे यांनी ठेवले. त्यामुळे हा मनसेला इशारा तर नाहीना अशी चर्चा सध्या आहे. विशेष म्हणजे दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच वसंतला मला दिल्लीला पहायचं आहे, असं शर्मिला ठाकरे यांनीच म्हटले होते. आता शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमांमध्ये साईनाथ बाबर यांना आता महापालिकेत पाहायचं नसून मोठ्या पदावर पाहायचं असल्याचे सांगितले.
वसंत मोरेंची बॅनरबाजी
वसंत मोरे यांनी बॅनरबाजी करून आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीच दाखवून दिला आहे. अशातच शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. असं वक्तव्य केल्याने साईनाथ बाबर यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याचा बोललं जात आहे.