पुणे : मराठा व्होटबँकेची ताकद दाखवून देण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार रिंगणात उतरवा, असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला होता. प्रत्येक जिल्ह्यात गावपातळीवर चर्चा करुन एकाच उमेवाराची निवड करा. एकापेक्षा अधिक मराठा उमेदवार रिंगणात असल्यास मराठा मतांची विभागणी होईल. त्यामुळे आपापसात चर्चा करुन एकच मराठा उमेदवार रिंगणात उतरवा, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर पुण्यात सकल मराठा समाजाची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत पुणे लोकसभा मतदार संघामध्ये मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यात येणार असून, सर्व मराठा समाजाने संबंधित उमेदवाराच्या पाठिशी पुर्णपणे उभे राहावे. असा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीमध्ये मनोग जरांगे यांनी केलेल्या सुचनेनुसार इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, 18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 30 मार्चपर्यंत पुण्यातील इच्छुकांचे अर्ज भरुन घेऊन ते सर्व अर्ज मनोज जरांगे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. मनोज जरांगे हे पुण्यातील उमेदवार जाहिर करणार आहेत. दरम्यानच्या काळात प्रत्येक प्रभागामध्ये छोट्या छोट्या बैठका घेऊन मराठा समाजाच्या मतांचा विचार ही केला जाणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
वसंत मोरेंची मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती
मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही, यासाठी मराठा समाजाकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीत वसंत मोरे यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर वसंत मोरे आता मराठा समाजाकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत का, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.