मुंबई : महाविकास आघाडी आणि वंचितची जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने धडाधड लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आज तिसरी यादी जाहीर केली असून पाच उमेदवारांच्या नावांचा आहे. यामध्ये पुण्यातून वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तसेच बारामतीमध्ये आपण उमेदवार देत नसल्याचं स्पष्ट केल आहे.
वंचितने या आधी दोन याद्या जाहीर केल्या आहेत. आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बागूल यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
पुण्यात तिरंगी लढत होणार
वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचीदेखील भेट घेतली होती. पण काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.
यानंतर वंसत मोरे वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आज अखेर याबाबतच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं असून वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाल आहे.