पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे पोहचल्याने, ही भेट राजकीय हेतूने घेतल्याची चर्चा झाली. आता ही भेट का घेतली, याचे कारण समोर आले आहे.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. वसंत मोरे बोलावलेले नसताना या बैठकीच्या ठिकाणी पोहचले. बैठक सुरु असताना वसंत मोरे शरद पवारांना भेटायला आतमध्ये पोहोचले. शरद पवारांनी दोन मिनिटे वसंत मोरेंना वेळ दिला आणि मोरे बैठकीतून बाहेर पडले. मात्र, दोन मिनीटांच्या या बैठकमुळे मोरे आता शरद पवार गटात प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरु झाली.
भेटीबाबत स्पष्टीकरण देताना वसंत मोरे म्हणाले की, शरद पवार यांची भेट निव्वळ सामाजिक कामासाठी होती. कात्रज दूध उत्पादक संघाच्या एका ९ एकर भूखंडावर मैदानाचे आरक्षण आहे. असे असताना राज्य सरकारमधील एका बड्या मंत्र्यांच्या साह्याने हे आरक्षण उठवून भूखंडाचा दुसऱ्या कामासाठी वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला आपला विरोध आहे. मैदान मैदानच राहावे, अशी भूमिका आहे. त्यामुळे तुम्हीही या कामाला विरोध करायला हवा, असे निवेदन खासदार सुळे यांना देण्यासाठी मी गेलो होतो.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबर यांना संधी देण्याबद्दल सुतोवाच केले होते. यानंतर मोरे यांनी सूचक व्हाट्सॲप स्टेट्स ठेवले. “कुणासाठी कितीबी करा, वेळ आली की फणा काढतातच; पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार…” वसंत मोरे यांनी नेमका कोणाला संदेश दिला याची चर्चा रंगली असतानाच, ते थेट शरद पवार यांच्यासोबत दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.