पुणे : काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाऊन वसंत मोरे यांनी आज भेट घेतली. या दोन्ही नेत्यामध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. यावेळी डोकं शांत ठेवून निर्णय घ्या असा सल्ला आमदार रविंद्र धंगेकर यांनी वसंत मोरे यांना दिला आहे. आमदार धंगेकर आधी मनसेत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दोघे सुरुवातीपासूनच चांगले मित्र आहेत. अशातच आता दोन्ही नेत्यांना पुणे लोकसभा लढवण्याची इच्छा आहे.
या भेटीनंतर धंगेकर म्हणाले की, आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत. शिवाय वसंत मोरेंपेक्षा मी वयाने मोठा आहे. त्यांचं काम चांगलं असून मी पाहिलेलं आहे. त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. त्यानंतर ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी डोकं शांत ठेवून सगळे निर्णय घ्यावेत आणि शिवाय त्यांना ज्या पक्षात प्रवेश करायचा आहे. त्यापक्षात प्रवेश करतानाही त्यांनी सगळा विचार करावा असा सल्ला रवींद्र धंगेकर यांनी वसंत मोरे याना दिला.
धंगेकर हे माझे गुरू : वसंत मोरे
यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, धंगेकर हे माझे गुरू आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यामुळं त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे, असं वसंत मोरे म्हणाले. रवींद्र धंगेकर हे पुणे शहरासाठी काम करतात. पुणे शहर कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित आणि सुंदर ठेवायचं आहे. त्यासोबतच आरोग्य व्यवस्था चांगली ठेवायची आहे. आमच्या दोघांचाही हेतू सारखा आहे. धंगेकर हे तीन वर्षांपासून काम करत आहेत आणि मी 15 वर्षांपासून काम करत आहे. आमचं पुण्यावर प्रचंड प्रेम आहे, असं वसंत मोरे म्हणाले.